टाटा समूहात अंतर्गत मतभेद? वरिष्ठांनी घेतली अमित शहा यांची भेट

0
38

दि०८(पीसीबी)-भारतातील आघाडीचा उद्योगसमूह असलेल्या टाटा समूहात अंतर्गत मतभेद तीव्र होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर, टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा, टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन, तसेच ट्रस्टचे दोन वरिष्ठ विश्वस्त दरायस खंबाटा आणि वेणु श्रीनिवासन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत अत्यंत महत्त्वपूर्ण भेट घेतली आहे.या बैठकीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन याही उपस्थित होत्या, ही बाब विशेष लक्षवेधी आहे. ही भेट अत्यंत खाजगी स्वरूपाची असून, याबाबत अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही. मात्र, टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्स यांच्यातील सत्ताकेंद्री संघर्ष आणि निर्णय प्रक्रियेतील मतभेदांमुळे ही बैठक झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

टाटा ट्रस्ट हे टाटा समूहाच्या एकंदर धोरणांवर मोठा प्रभाव ठेवतात. ट्रस्टचे अध्यक्षपद, ट्रस्टींची निवड, आर्थिक पारदर्शकता आणि गटाच्या नियंत्रणाबाबत चाललेल्या अंतर्गत चर्चांमुळे गेल्या काही महिन्यांत वाद वाढले आहेत. यापूर्वीही नोएल टाटा यांना समूहात अधिक प्रमुख भूमिका दिली जावी अशी मागणी होत होती, जी काही प्रमाणात दुर्लक्षित झाल्याचे बोलले जात होते.दुसरीकडे, टाटा सन्सचे कार्यकारी चेअरमन एन. चंद्रशेखरन यांचे नेतृत्व उद्योग क्षेत्रात यशस्वी मानले जात असले तरी, ट्रस्टमधील काही गट त्यांच्यावर नाराजी व्यक्त करत असल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते.

टाटा समूह हा देशाच्या औद्योगिक, सामाजिक आणि आर्थिक धोरणांमध्ये मोठा वाटा उचलतो. त्यामुळे त्यामधील वाद जर विकोपाला गेला, तर त्याचा परिणाम थेट उद्योगजगतात आणि गुंतवणूकदारांवर होऊ शकतो. हे लक्षात घेता, सरकारकडून मध्यस्थीची शक्यता निर्माण झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
अमित शहा आणि निर्मला सीतारामन यांच्यासमवेत झालेली ही बैठक केवळ सौजन्यपूर्तता होती की, गंभीर संस्थात्मक वाद मिटवण्यासाठी प्रयत्न? यावर अद्याप स्पष्टता नाही. मात्र, या भेटीमुळे टाटा समूहातील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे.टाटा समूहाच्या नेतृत्वातील बदल, ट्रस्टच्या धोरणांमध्ये अपेक्षित फेरफार, आणि नोएल टाटा यांची भविष्यातील भूमिका या सगळ्यांवर येत्या काळात उद्योगजगताचं लक्ष असणार आहे.