…तर उद्याचा शिवसेनेचा निकाल ठाकरेंच्या बाजुने असेल

0
60

पुणे, दि. ७ संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह (धनुष्यबाण) या वादाच्या प्रकरणावर उद्या अंतिम सुनावणी होणार आहे. उद्या ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी पार पडणार आहे. खरी शिवसेना कोणाची या मुद्द्यावर हा अंतिम फैसला होण्याची शक्यता होणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता याप्रकरणी ॲड. असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली. उद्याचा निर्णय भारतीय संविधानाला धरुन लागला, तर तो निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागेल, अशी माहिती ॲड. असीम सरोदे यांनी दिली.

ॲड. असीम सरोदे यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या प्रकरणाच्या मुद्द्यावर भाष्य केले. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे पक्षचिन्ह प्रदान केले, ती प्रक्रिया मुळात चुकीची आहे, आक्षेपार्ह आणि बेकायदेशीरतेकडे जाणारी आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे त्यांनी फक्त चिन्ह देणं अपेक्षित होतं, पण शिवसेना ही एकनाथ शिंदेंची असाही एक निकाल देऊन टाकला आहे. जो त्यांच्या अख्यारित बसत नाही. ते त्यांच्या अधिकार क्षेत्राचे उल्लंघन ठरते. या दोन मुद्द्यांवर उद्या सुनावणी होणार आहे. हा युक्तीवाद लेखी स्वरुपात मांडण्यात आला आहे. त्यामुळे उद्या याबद्दलचे मौखिक स्वरुपात सुनावणी होईल. त्यानंतर एक निकालही जाहीर केले जाऊ शकतो, असे असीम सरोदे म्हणाले.

आता उद्या नक्की सुनावणी होईल असं वाटतंय. कारण न्यायाधीशांनी असं म्हटलं होतं की मुख्य याचिकेवर जेव्हा जस्टिस चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय दिला होता आणि राहुल नार्वेकर यांच्याकडे ते प्रकरण सुपूर्द केले होते. पण त्यांनीही बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असा निर्णय घेतला असं आमचं म्हणणं आहे. त्यालाही आव्हान देण्यात आलं होतं. या दोन्ही याचिकांवर एकत्र सुनावणी करु अशीही सूचना न्यायाधीशांतर्फे आली होती. पण आता फक्त पक्षचिन्हाबद्दलची सुनावणी घेतली जाणार आहे. राजकीय आणि कायद्याच्या दृष्टीकोनातून ही सुनावणी आता होण्याला फार महत्त्व आहे. पक्षचिन्हासंदर्भातील निर्णय व्हायला हवा. अगदी उद्धव ठाकरेंच्या विरोधात निकाल दिला तरी चालेल. कारण निकाल देताना कोणत्या कारणांसह तो निकाल दिला जाणार आहे, हे देखील समाजातील लोकांना समजलं पाहिजे. कोणत्याही प्रकारचा निर्णय आला तरी तो भारतीय संविधानाला धरुन तो असला तर तो निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागेल, अशी शक्यता आहे, असेही असीम सरोदे यांनी सांगितले.

मूळ शिवसेना निवडणूक लढवेल
धनुष्यबाण हे चिन्ह मूळ शिवसेनेचे आहे, ते चोरण्यात आलं आहे. संवैधानिक रित्या जी चोरी झाली ती महाराष्ट्राने पाहिली आहे. त्यामुळे शिवसेनेचे जे धनुष्यबाण चिन्ह आहे ते परत द्यायचं का याचा निर्णय सर्वोच्च न्यायलय घेईल. त्यांनी ते परत दिलं तर चांगली गोष्ट आहे. नाहीतर त्यांनी ते गोठवलं तरी चालेल. यानंतर जे काही सर्वोच्च न्यायालय पक्षचिन्ह देईल, त्यावर मूळ शिवसेना निवडणूक लढवेल, असेही असीम सरोदे म्हणाले.