शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं…

0
41

छत्रपती संभाजीनगर, दि. ७ : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे यांनी पहिल्यांदाच शरद पवारांवर टीका केली आहे. 1994 साली शरद पवारांनी आमच्या हक्काचं 16 टक्के आरक्षण ओबीसींना दिलं आणि आमचं वाटोळं केलं अशी टीका जरांगे यांनी केली. तसेच ज्या शरद पवारांनी ओबीसींना आरक्षण दिलं, त्यांचे सुद्धा उपकार ओबीसी नेत्यांनी ठेवलं नसल्याची टीकाही जरांगे यांनी केली.

ओबीसींच्या नेत्यांनीच ओबीसी समाजाचं वाटोळं केल्याचं बोलत असताना मनोज जरांगे यांनी शरद पवारांवरही टीका केली. 1994 साली देण्यात आलेल्या ओबीसी आरक्षणामुळे मराठ्यांचं वाटोळं झाल्याचं ते म्हणाले.

मनोज जरांगे म्हणाले की, “ओबीसी समाजाला 1994 साली देण्यात आलेलं आरक्षण हे मराठ्यांच्या हक्काचं होतं. आमचं 16 टक्के आरक्षण आम्हाला मिळणार आहे. पण ज्यांनी ओबीसींना आरक्षण दिलं त्या शरद पवारांचे उपकार ओबीसी नेत्यांना नाहीत. शरद पवारांनी आमचं तर वाटोळंच केलं. 1994 साली आमचं आरक्षण शरद पवारांनी ओबीसींना दिलं.”

मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या आधी अनेकदा आंदोलनं केली. या आंदोलनांना शरद पवारांचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप अनेकदा भाजपच्या नेत्यांनी केला होता. त्यावेळी जरांगे यांनी शरद पवारांवर टीका केली नव्हती. पण आता शरद पवारांनीच मराठ्यांचं वाटोळं केल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

जरांगेंचा छगन भुजबळांवर आरोप
मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंमध्ये पुन्हा एकदा वाद पेटल्याचं दिसून येतंय. छगन भुजबळांवर गंभीर आरोप करत जरांगेंनी एक मोठा दावा केला. छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांच्यात एक गुप्त बैठक झाली, या बैठकीत ओबीसी आंदोलनाचं नेतृत्व काँग्रेसकडे घ्यावं, असं भुजबळ वडेट्टीवारांना म्हणाल्याचा दावा जरांगेंनी केला.

अजित पवारांनी मला इथं गुंतवून ठेवलंय. त्यामुळे नेतृत्व काँग्रेसकडे घ्यावं, असं भुजबळ वडेट्टीवारांना म्हणाल्याचा दावा मनोज जरांगेंनी केला. दरम्यान, जरांगेंच्या आरोपांवरून भुजबळांनी टीका केलीये. जरांगे हे काही मराठा समाजाचे नेते नाहीत, असं भुजबळ म्हणाले.

मराठा समाजाने मनोज जरांगे यांना उगाचच डोक्यावर उचलून घेतलंय, ते काही मराठ्यांचे नेते नाहीत असं सांगत भुजबळांनी जरांगे यांच्यावर टीका केली. तर जरांगेंनी दावा केल्याप्रमाणे कोणतीही बैठक झाली नसल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले.