पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पत्रकारांबरोबर इतरांनी पुढे यावे – आण्णा बनसोडे

0
31

भोसरीतील महारक्तदान शिबिराला पत्रकार व नागरिकांचा मोठा प्रतिसाद

पिंपरी,दि. ६ – मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभे आहे. स्वतः होऊन स्वयंस्फूर्तीने पत्रकार बंधू, भगिनी देखील आता मराठवाडा मिशन उपक्रमातून मदतीस आले आहेत. आपण समाजाचे देणं लागतो या कृतज्ञ भावनेतून त्यांनी आयोजित केलेले रक्तदान शिबिर हा स्तुत्य उपक्रम आहे. यास माझ्या शुभेच्छा. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व
राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ लांडेवाडी, आणि नवमहाराष्ट्र मित्र मंडळ या सारख्या समाजातील इतर संस्था, संघटना, मंडळ, ट्रस्ट, उद्योजक व दानशूर व्यक्तींनीही पुढे यावे असे आवाहन विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केले.
मराठवाड्यात मागील दोन महिन्यात झालेल्या पाऊसामुळे तेथील शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे, हजारो दुभती जनावरे मृत्युमुखी पडली असून तेथील शेतकरी उध्वस्त झाला आहे. पूरग्रस्त भागात रोगराई पसरली तर रक्ताचा तुटवडा भासू शकतो यासाठी मराठवाडा मिशन अंतर्गत पहिला टप्पा म्हणून भोसरी येथे रक्तदान शिबिर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ लांडेवाडी, आणि नवमहाराष्ट्र मित्र मंडळ, भोसरी या संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे व भोसरी विधासभेचे प्रथम आमदार विलास लांडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक विश्वनाथ लांडे, विक्रांत लांडे पाटील, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई चे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, राज्य समन्वयक नितीन शिंदे, पुणे जिल्हा अध्यक्ष बापू जगदाळे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन चपळगावकर, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अतुल क्षीरसागर, प्रसिद्ध चित्रकार संजय खिलारे, अभिनेत्री आर्या घारे, उद्योजक विकास साने, ब्राम्हण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.सचिन बोधणी, ॲड. गणेश शिंदे, संभाजी बिग्रेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, टी वी ९ मराठीचे प्रतिनिधी रणजीत जाधव, साम
मराठी चे प्रतिनिधी गोपाळ मोटघरे, आपला आवाज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुल परदेशी, एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी सुरज कसबे आदी उपस्थित होते.
या शिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ४०० पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
माजी आमदार विलास लांडे पाटील यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, किल्लारी भूकंपा नंतर अनेक वर्षानंतर मराठवाड्यावर ओढवलेले हे मोठे संकट आहे. पण या संकटात पूरग्रस्त बांधवानी एकटे समजू नये, तर पिंपरी चिंचवड मधील नागरिक कायम त्यांच्या सोबत आहेत, पत्रकारांनी सामाजिक जाणिवेतून घेतलेला हा उपक्रम पूरग्रस्त भागातील बांधवांना दिलासा देणारा ठरेल असा विश्वास वाटतो.
प्रास्ताविक करताना गोविंद वाकडे यांनी सांगितले की, रक्तदान हे जीवदान आहे. आपण दिलेल्या रक्तामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतो ही समर्पणाची भावना ठेऊन आयोजन केले आहे. रक्ताच्या शेवटच्या थेंबा पर्यंत आम्ही मराठवाड्यातील शेतकरी बांधवांसोबत आहोत असे गोविंद वाकडे यांनी सांगितले.
सचिन चपळगावकर यांनी सांगितले की, हे संकलन केलेले रक्त गरजू रुग्णांना सोमवार पासून बार्शी येथील भगवंत ब्लड बँक आणि उमरगा, धाराशिव येथील श्री श्री रविशंकर ब्लड बँक स्टोरेज येथे उपलब्ध होईल.