बाळासाहेब ठाकरे मृत्यूवर विवाद; अनिल परबांचा रामदास कदमांना थेट इशारा

0
3

दि०४(पीसीबी)-नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यादरम्यान शिवसेनेतील वाद उग्र झाले आहेत. माजी मंत्री रामदास कदम यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी ‘बाळासाहेबांचा मृतदेह मातोश्रीत दोन दिवस का ठेवला?’ असा दावा करत तपासाचा आग्रह धरला.यावर प्रतिक्रिया देताना अनिल परब यांनी रामदास कदमांवर थेट आक्षेप घेतले. परब म्हणाले की, रामदास कदमांनी नार्कोटिक्स टेस्ट करणे गरजेचे आहे. तसेच, १९९३ मध्ये ज्योती रामदास कदम यांनी स्वतःला जाळून घेतल्याचा प्रकारही तपासला पाहिजे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

अनिल परब म्हणाले, “रामदास कदम हे भाडगिरी करणारे आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूवर जो आरोप केला आहे, त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. त्यांना तातडीने माफी मागावी नाहीतर कायदेशीर कारवाई केली जाईल.”परबांनी पुढे सांगितले की, “दारू पिऊन खेड्यात कशा प्रकारे गैरव्यवहार केले जातात, हे अधिवेशनात मांडणार आहे. या सगळ्या आरोपांची सत्यता कोर्टातच समोर येईल.”

हा राजकीय वाद आता आणखी तीव्र होत असून, शिवसेनेतील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनात चांगलीच खळबळ उडाली आहे. पुढील राजकीय परिस्थिती कशी वळण घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.