कफ सिरप घेतल्याने मध्यप्रदेशात १२ मुलांचा मृत्यू

0
5

दि.०४(पीसीबी)-मध्यप्रदेशातील दिवास जिल्ह्यात एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कफ सिरप घेतल्यानंतर तब्बल १२ लहान मुलांचा मृत्यू झाला असून, या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, या मुलांना ताप आणि सर्दीमुळे स्थानिक दवाखान्यातून कफ सिरप दिले गेले होते. मात्र औषध घेतल्यानंतर काही तासांतच मुलांची तब्येत बिघडू लागली. काहींना उलट्या, काहींना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही १२ मुलांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाने प्राथमिक तपासात सांगितलं की वापरलेलं कफ सिरप हे स्थानिक फार्मसीमधून मिळालेलं होतं आणि त्याच्या उत्पादनावर गुणवत्ता तपासणीचा कोणताही ठोस पुरावा नव्हता. आता संबंधित औषध निर्मात्यांविरोधात फसवणूक व इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.औषध प्रशासन (FDA) आणि पोलीस विभागाने औषधाचे नमुने जप्त केले असून तपासणी सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार, सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकॉल नावाचा विषारी रसायन असण्याची शक्यता आहे जे पूर्वीही गिनी, इंडोनेशिया आणि गांबिया येथे अशाच मृत्यूंसाठी जबाबदार ठरले आहे.मृत मुलांच्या पालकांनी प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. “आमच्या निरागस मुलांचा बळी गेला… हे औषध बाजारात कसं आलं?” असा सवाल पालकांनी केला आहे.

डॉक्टर्स आणि विशेषज्ञ काय म्हणतात?
तज्ज्ञ सांगतात की, डायथिलीन ग्लायकोल हे किडनीसाठी अत्यंत घातक रसायन आहे, आणि याचा अतिसूक्ष्म प्रमाणातही शरीरात प्रवेश झाला तरी तो जीवघेणा ठरू शकतो.औषध निर्मितीमध्ये या रसायनांचा वापर कॉस्ट कटिंगसाठी काही बनावट कंपन्या करतात, ही एक गंभीर बाब आहे.