महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ,संततुकाराम नगरच्या वतीने आभिजीत मराठी भाषा दिन साजरा.
जेष्ट साहित्यिक राजेंद्र घावटे म्हणाले की,माय मराठीला समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. तिच्या संवर्धनाची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचा मुकुट ल्यालेली , तुकोबांच्या गाथेचा मळवट भाळी भरलेली, नामदेवांच्या कीर्तनाचा शालू पांघरलेली एकनाथांच्या भागवताची पैठणी नेसलेली अशी ही माय मराठी ! सकल संतांच्या पंक्तीने अलंकृत आहे. राष्ट्रपुरुष व समाजधुरीण यांच्या कार्याचा वारसा जोपासणारी आणि शिवरायांच्या स्वराज्याची पताका खांद्यावर घेऊन ती डौललदारपणे वर्षानुवर्ष भारत वर्षामध्ये वावरते आहे.
मराठी भाषेला शासनदरबारी अभिजात दर्जा मिळणं ही खऱ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट आहे. मराठी भाषा मुळातच अभिजात आहेच. भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकाची बोलली जाणारी भाषा आणि जगामध्ये दहाव्या क्रमांकाची बोलली जाणारी भाषा…. बारा कोटी लोकांची भाषा खऱ्या अर्थाने मराठी ही एक समृद्ध भाषा आहे. अभिजात दर्जा मिळाल्यामुळे भाषेचा प्रसार आणि प्रचार जास्त जोमाने होईल. भाषेचं साहित्य इतर भाषांमध्ये जाईल आणि संपूर्ण जगामध्ये मराठी भाषेच्या वैभवाची ओळख नव्याने निर्माण होईल. आपण सर्वांनी ज्ञानभाषा आणि व्यवहार भाषा म्हणून आग्रहाने मराठीचा वापर वाढवणे गरजेचे आहे. आपण व्यवहारात मराठी चा वापर आवर्जून केलाच पाहिजे. आपली भाषा जोपासत ती वृद्धिंगत होण्याचा संकल्प करू या !
अध्यक्षीय भाषणात सुरेश कंक म्हणाले की, आम्ही अनेक वेळा मराठी भाषेला आभिजात दर्जा मिळण्यासाठी शहरातील साहित्यिकांनी लक्षणिक उपोषण केले, पटनाट्यातुन जनजागृती केली आणि आपल्या सर्वांच्या प्रयत्नामुळे आज आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.
प्रमुख पाहुणे अण्णा जोगदंड म्हणाले की मराठी भाषेला 3 ऑक्टोबर 2024 ला केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आहे ,भाषेला आभिजात दर्जा मिळण्यासाठी हजारो वर्षाची परंपरा असावी लागते यामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख “अमृतातेही पैजाही जिंके” असा उल्लेख केला आहे, अभिजात भाषेला दर्जा मिळाल्यामुळे जागतिक स्तरावर भाषेचे महत्त्व वाढले आहे, 2024 मध्ये मराठी,पाली, पाकृत, असामी,बंगाली या भाषांना आभिजात दर्जा मिळाला आहे,अभिजात दर्जा मिळण्यासाठी ती भाषा प्राचीन व साहित्य श्रेष्ठ असावी लागते,भाषेचे वय दीड ते दोन हजार वर्षाचे असावे लागते, भाषेला स्वयंभूपण असावे लागते या सर्व निकषात आपली मराठी भाषा बसली आहे, भारतात 121 भाषा व 270 मातृभाषा बोलल्या जातात,22 भाषा राज्यघटनेने आठव्या सूचीमध्ये समाविष्ट केलेला आहेत असे अण्णा जोगदंड यांनी सांगितले .
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र घावटे, ज्येष्ठ साहित्यिक व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश कंक ,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अण्णा जोगदंड ,केंद्र संचालक अनिल कारळे, सुरेखा मोरे ,संगीता क्षीरसागर ,शैलजा आवडे ,प्रतिभा गोसावी ,सोनल बोबले ,ऐश्वर्या गायकवाड ,निशा भोसले, जयश्री आडसूळ, पल्लवी डावकर उपस्थित होते.














































