सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या अंगणवाडीच्या ताईंना आता तरी न्याय मिळावा- डॉ. बाबा आढाव

0
47

चिंचवड दि.1 – दुबळ्या घटकातील मुलांच्या पोषणाची काळजी घेणाऱ्या , या मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देणाऱ्या, देशाच्या लोकसंख्या नियंत्रणाची काळजी घेणाऱ्या, लसीकरणाद्वारे आयुष्यमान वाढवणाऱ्या, गरोदर महिलांना शास्त्रीय मार्गदर्शन करणाऱ्या अंगणवाडीला आता पन्नास वर्षे पूर्ण झाली. मात्र ती चालवणारी अंगणवाडी ताई अजूनही मानधनावरच आहे. हा तिच्यावरील अन्याय आहे. सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या अंगणवाडीच्या ताईला आता तरी न्याय द्या. असा आग्रह आज जेष्ठ समाजसेवक डॉ बाबा आढाव यांनी शासनाकडे धरला. एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजे अंगणवाडीला उद्या महात्मा गांधी जयंती दिवशी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.

त्यानिमित्ताने आज चिंचवड येथील रोटरी क्लबच्या सभागृहात अंगणवाडीच्या 51 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अंगणवाडी कर्मचारी सभा आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना पिंपरी पूर्व च्या वतीने आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी पुणे विभागाचे महिला बाल विकास उपायुक्त संजय माने होते.
भारतात सुपोषण, प्राथमिक शिक्षण, आयुरमान वृद्धी, आरोग्य, लोकसंख्या शिक्षण आदी विषयात अतिशय मूलभूत कार्य करणाऱ्या एकात्मिक बाल विकास योजनेला उदया 2 ऑक्टोबरला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशातील मानवी विकास पुढच्या टप्प्यावर नेऊन ठेवणाऱ्या आयसीडीएस म्हणजे अंगणवाडी या नावाने परिचित असलेल्या योजनेच्या 51 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आज येथे झाला. यावेळी अंगणवाडी कर्मचारी सभेचे अध्यक्ष नितीन पवार, बाल विकास प्रकल्प अधिकारी सुरेश टेळे, रोटरी क्लबचे अध्यक्ष आनंद संपत, हमाल पंचायतीचे सरचिटणीस गोरख मेंगडे आदी सभा मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची भूमिका सांगताना पवार म्हणाले ” देशात कुपोषणाने थैमान घातले होते. प्राथमिक शिक्षणाची वानवा होती. गरोदरपणा च्या काळात महिलांना पोषक आहार मिळत नव्हता. लसीकरण, लोकसंख्या शिक्षण दुर्लक्षित विषय होते. अशा काळात 2 ऑक्टोबर 1975 रोजी, महात्मा गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजना सुरू केली. या योजनेत अतिशय अल्प मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी मानवी विकासाच्या सर्वांगीण विषयात अतिशय तन्मयतेने, प्रामाणिकपणे,प्रभावी काम केले. बांबूच्या पट्ट्या, तस्कर लावलेल्या झोपड्यांचा सर्वे करत येथील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी अंगणवाडी येण्याची गोडी लावली. महिलांना कुटुंब नियोजनाचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या गरोदरपणामध्ये आणि तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी पूरक पोषक आहार पोहोचवला. ज्यामुळे योग्य काळात मुलांच्या मेंदूचा विकास झाला. त्यांच्या कामामुळे सरकारी योजनेला अभावानेच लाभणारी विश्वासाहर्ता मिळाली. अंगणवाडी ताई या देशाच्या मानवी विकास दूत आहेत. ही वस्तुस्थिती अधोरेखित करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
संजय माने,सुरेश टिळे यांनीही मार्गदर्शन केले.
सुवर्ण महोत्सवा निमित्त या योजनेतील जेष्ठ सेविका आणि मदतनिसांचा डॉ आढाव यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.यामध्ये लता वाळके, मीनाक्षी शिंदेकर, सुनिता कांडगे, मोहिनी सोनपाटकी, रजनी बायस्कर, ताराबाई रोकडे, मंगल घुल,सुमन पाटील, नंदा भालेराव, मीनल भालेराव, संजीवनी नेवाळे, मंगला पाटील तसेच मुख्य सेविका महानंदा जायभाय,दीपा शितोळे, अर्चना राहीनज,अस्मिता गावडे, पद्मजा काळे यांचा समावेश होता.
1975 साली योजना सुरू झाल्यानंतर, या योजनेतील एक प्रकल्प 1978 साली पिंपरी चिंचवड मध्ये सुरू झाला. त्या प्रकल्पात सुरुवातीपासून काम करणाऱ्या आता निवृत्त झालेल्या शशिकला पंडित यांचाही विशेष गौरव करण्यात आला.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय मार्फत सुमारे 300 अंगणवाडी सेविका मदतनीस यांची कार्यक्रम स्थळी मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. त्यातील दीडशे जणींना जतन फाउंडेशन च्या वतीने जवळच्या नंबरचे चष्मे मोफत दिले गेले. या तपासणीत मोतीबिंदूचे निदान झालेल्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रियाही रुग्णालयाच्या वतीने मोफत केली जाणार आहे.
याप्रसंगी रिक्षा पंचायत पिंपरी चिंचवडचे अशोक मिरगे, काशिनाथ शेलार, पथारी संघटनेचे शैलेश गाडे, महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे ओंकार मोरे या सर्वांना उपक्रमाच्या सहकार्याबद्दल गौरवण्यात आले.