दि.०१(पीसीबी)-राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शाब्दिक चकमकीने वातावरण तापलं आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या मालिकेत आणखी एक वळण आलं आहे.सांगलीच्या दसरा मेळाव्यात बोलताना आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करत, “जयंतराव, तुझ्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं?” असा सवाल उपस्थित केला.
इतकंच नव्हे, तर पाटलांना “जयंत्या” म्हणत त्यांनी नाव घेऊन तिखट शब्दांत हल्लाबोल केला.काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी नाव न घेता पडळकरांना “मंगळसूत्र चोर” असा उल्लेख केला होता. त्यावर पडळकरांनीही प्रत्युत्तर देताना जयंत पाटलांच्या वडिलांचा उल्लेख करत वैयक्तिक पातळीवर टिका केली होती. मात्र, त्या वेळी जयंत पाटलांनी त्याला उत्तर न देता अनुल्लेखाने मारणे पसंत केलं होतं.
पडळकरांच्या अलीकडील वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “ही टीका कोणी तरी पाठीशी आहे म्हणून केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी समज दिल्यावरही पडळकर जाणीवपूर्वक असं वक्तव्य करत आहेत,” असा आरोप शिंदे यांनी केला.
त्यांनी पुढे म्हटलं, “सरकारमधील यंत्रणा आपल्या बापाच्या असल्यासारखं वागत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार न करता ठरवून हे राजकारण केलं जात आहे. जयंत पाटील हे दबावाला बळी पडणारे नेते नाहीत. त्यामुळे त्यांना डॅमेज करण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत.”
शिंदे यांनी भाजपच्या अंतर्गत शिस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “शिस्त पाळणाऱ्या पक्षातच आता शिस्त राहिलेली नाही. मग त्यांचे कान RSS च्या प्रमुखांनी टोचावेत,” असा उपरोधिक टोला लगावला.राज्याच्या राजकारणात पदांपेक्षा टीकेची भाषा मोठी होत चालली आहे. जनतेने सुजाणपणाने आणि विवेकाने याकडे पाहण्याची गरज असल्याचा सूर अनेकांकडून व्यक्त होत आहे.










































