दि.०१(पीसीबी)-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (एसपीपीयू) पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमधील जवळपास २५ ते ३० टक्के जागा गेल्या तीन वर्षांपासून रिक्त राहिल्याचे उघड झाले आहे. यासोबतच, पीएचडी अभ्यासक्रमांतील प्रवेशसंख्येतही मोठी घसरण झाली असून, २०२१-२२ मध्ये २३५ विद्यार्थ्यांनी पीएचडीसाठी प्रवेश घेतला असताना, २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात ही संख्या केवळ १७ वर आली आहे.
ही माहिती विद्यापीठाच्या आगामी सिनेट बैठकीच्या अजेंडामधून समोर आली असून, ही बैठक ३० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. एका सिनेट सदस्याच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरात हे धक्कादायक आकडे स्पष्ट करण्यात आले आहेत.
सिनेटच्या अजेंडामध्ये उपस्थित करण्यात आलेल्या अनेक मुद्द्यांपैकी, विद्यापीठाच्या राष्ट्रीय स्तरावरील रँकिंगमधील मोठी घसरण हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी (२०२३) राष्ट्रीय संस्थागत गुणवत्ता निर्धारण चौकटीत (National Institutional Ranking Framework – NIRF) एसपीपीयूने एकूण रँकिंगमध्ये ३७वे स्थान मिळवले होते. मात्र, यावर्षी (२०२४) ही रँकिंग थेट ९१व्या क्रमांकावर घसरली आहे.
विशेषतः पीएचडी प्रवेशामधील घसरणीचा परिणाम संशोधन कार्यावर होतो. नामवंत शैक्षणिक आणि वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये प्रकाशित होणाऱ्या शोधनिबंधांची संख्या हे NIRF रँकिंगमधील एक महत्त्वाचे निकष आहे. त्यामुळे पीएचडी प्रवेशातील घट ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रँकिंगमधील घसरणीचे मुख्य कारण मानले जात आहे.










































