सणासुदीत वीजपुरवठा सुरळीत ठेवा- खा.श्रीरंग बारणे

0
41

दि.२४(पीसीबी) – सध्या सणासुदीचे दिवस असून, या उत्सव काळात महावितरणे वीजपुरवठा सुरळीत ठेवावा तसेच ग्राहकांच्या तक्रारी तातडीने सोडवाव्यात असे निर्देश मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा केंद्रिय स्थायी ऊर्जा समितीचे सभापती श्री. श्रीरंग बारणे यांनी दिले आहेत.बुधवारी (दि. २४) दुपारी खा. बारणे यांनी महावितरणच्या पिंपरी कार्यालयात पिंपरी व भोसरी विभागाची आढावा बैठक घेतली. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला शिवसेनेचे पिंपरी शहर संघटक संतोष सौंदणकर, माजी नगरसेवक प्रमोद कुटे, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल काकडे, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे व अतुल देवकर यांचेसह पिंपरी व भोसरी परिसरातील अभियंते उपस्थित होते.

बैठकीला संबोधित करताना खा. बारणे म्हणाले, महावितरणने केंद्र सरकारची प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची जनजागृती वाढवावी. जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ द्यावा. जेणेकरुन महाराष्ट्राचा क्रमांक देशात प्रथम येईल. बैठकीत मोहननगर, आकुर्डी, विवेकनगर, पिंपरी व भोसरी या भागातील नागरिकांनी विविध समस्या मांडल्या. तेंव्हा ग्राहकांच्या तक्रारींची सोडवणूक वेळेत करावी. त्यासाठी नवनविन तंत्रज्ञानाचा वापर करावा अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी खा. बारणे यांच्या हस्ते सूर्यघर योजनेतील ग्राहकांना प्रातिनिधीक स्वरुपात वीजमीटरचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुख्य अभियंता सुनिल काकडे व अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांनी वीज ग्राहकांच्या तक्रारींची वेळेत निपटारा करण्याचे व अखंडित वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासित केले.