दि.२५(पीसीबी)-एकिकडे मतमोजणीमध्ये पारदर्शकता नाही म्हणून विरोधकांकडून सतत सत्ताधाऱ्यांसह निवडणुक आयोगावर टीका केली जाते. दरम्यान, पारदर्शकतेसाठी निवडणुक आयोगाकडून आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे. : प्रत्येक मत योग्यरित्या मोजले जावे, कोणत्याही अडथळ्यांशिवाय प्रक्रिया व्हावी यासाठी आयोगाने आणखी एक पाऊल उचलले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने 24 तासांत दुसरा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मतदारयादीतून मतदाराचे नाव वगळण्याबाबतच्या प्रक्रियेच्या नियमात पारदर्शकता आणल्यानंतर आता मतमोजणीबाबतही निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
अनेक निवडणुकांमध्ये टपाली मतदानावरून घोळ झाल्याचे आढळून आले आहे. मतमोजणीच्या अखेरपर्यंत टपाली मतदानावरून उमेदवार आमनेसामने उभे ठाकलेले असतात. आता आयोगाने मतमोजणीच्या नियमात बदल केला आहे.
निवडणूक आयोगाने प्रसिद्धिपत्रक जाहिर करत मतमोजणीच्या दिवशी टपाली मतदानाची मोजणी सकाळी 10 वाजता सुरू होते. त्यानंतर सकाळी 8.30 वाजता ईव्हीएम मधील मतांची मोजणी सुरू केली जाते. यापूर्वी ईव्हीएमची मोजणी टपाली मतमोजणीच्या कोणत्याही टप्प्यावर सुरू ठेवली जात होती.
दिव्यांग मतदार आणि ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत पोस्टल मतांची अचूक आणि वेगवान मोजणी सुनिश्चित करण्यासाठी आयोगानं नव्या सूचना जारी केल्या आहेत.
आयोगानं मतमोजणी केंद्रांवर अधिक टेबल्स आणि कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे पोस्टल मतपत्रिकांची मोजणी वेळेत आणि काटेकोरपणे पूर्ण होणार आहे. या निर्णयामुळे मतमोजणीच्या प्रक्रियेत गती येणार असून, अंतिम निकाल जाहीर करण्यात होणारा विलंब टाळता येईल.
ईव्हीएम मतमोजणीच्या अखेरच्या दोन फेऱ्या शिल्लक असताना टपाली मतमोजणी सुरू असल्यास ईव्हीएमची मतमोजणी थांबविली जाईल. टपाली मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच ईव्हीएमच्या राहिलेल्या दोन फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण होईल. मतमोजमीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि एकरूप होण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. प्रत्येक मताची मोजणी योग्यप्रकारे आणि कोणत्याही अडथळ्यांशिवाय व्हावी, हे अपेक्षित असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
टपाली मतांची संख्या अधिक असल्यास त्याठिकाणी योग्य प्रमाणात टेबल्स आणि मतमोजणी करणाऱ्यांची पुरेशी संख्या उपलब्ध असायला हवी, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.