राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या गट व गणनिहाय अंतिम मतदार याद्या व मतदान केंद्रांची यादी 27 ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी दिले. दिवाळीनंतर याद्या अंतिम होणार असून निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीने ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या गटाची व पंचायत समितीच्या गणांची प्रभाग रचना नुकतीच पूर्ण केली. आता मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिला आहे.