धाराशिव जिल्ह्यातील परंडा, भूम, वाशी यासह सोलापूरच्या बार्शीमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. या पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. धाराशिव, सोलापूर, बीड, हिंगोली, जालना,सातारा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात देखील अतिवृष्टीमुळं मोठं नुकसान झालं आहे. एनडीआरएफच्या पथकांकडून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं जात आहे. धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी परंडा तालुक्यातील एका बचावकार्याची माहिती दिली आहे.
ओम राजेनिंबाळकर यांनी वडनेर ता. परंडा येथे एका कुटुंबाच्या बचाव कार्यात एनडीआरएफच्या पथकासोबत सहभाग घेतला. याबाबत त्यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे.
ओम राजेनिंबाळकर यांच्या पोस्टनुसार आज वडनेर ता.परंडा येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील एक आजी व 2 वर्षाचा मुलगा व 2 व्यक्ती रात्री 2 पासून पूर्ण पाण्याने वेढले होते व स्वतःच्या घरावर अन्न व पाण्यविणा मदतीच्या अपेक्षेने अडकले होते
एनडीआरएफच्या जवांनाच्या मदतीने ओम राजेनिंबाळकर स्वतः या कार्यात सहभागी होऊन कुटुंबाला सुखरुप पणे बाहेर काढण्यासाठी सहभागी झाले. आज संध्याकाळी 8 वाजता या सर्वांना वाचवण्यात यश आल्याने मनाला खूप समाधान मिळाले, असं ओम राजेनिंबाळकर म्हणाले.
या कार्यात एनडीआरएफच्या जवानांनी व गावकऱ्यांनी देखील कष्ट व मेहनत घेऊन सदरील बचावकार्य यशस्वी रित्या पार पाडले याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व अभिनंदन असंही ओम राजेनिंबाळकर म्हणाले. दरम्यान परंडा ,भूम, वाशी व बार्शी या भागात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला असून त्यामुळे अनेक तलाव धोकादायक व काही तलाव फुटले आहेत. शेतीचं देखील मोठं नुकसान झालं आहे.














































