सावरकर उद्यानात राहणाऱ्या पक्ष्यांनी जायचे कोठे…

0
35

 देवराई संस्थेचे धनंजय शेडबाळे यांचा पालिका आयुक्तांना सवाल निगडी प्राधिकरणातील सावरकर उद्यानातील नवरात्रीच्या उत्सवासाठी कानठळ्या बसणारा ध्वनी आणि डोळे दीपविणाऱ्या प्रकाश योजनेमुळे तेथील सजीवसृष्टीचे जगणे मुश्किल झाले आहे. जेष्ठ पर्यावरणप्रेमी आणि देवराई फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय शेडबाळे यांनी त्याबाबत अत्यंत तळमळीने कठोर शब्दात महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त यांना पत्र दिले आहे. आहे तसे पत्र शेडबाळे यांच्याच शब्दात देत आहोत. मान. आयुक्त आणि हरित सेतू प्रोजेक्ट लीडर,

माननीय महोदय, माझे आपणांस विचारणे आहे, हरित सेतू म्हणजे काय? फक्त लोकांकरिता केले जाणारे कॉरिडॉर्स, सायकल ट्रॅक्स, झाडे लावली का झाले का?


सावरकर उद्यान सेक्टर 26 गेटजवळ आज नवरात्रीचा नंगानाच सुरू होताना मी पाहिला. प्रचंड आवाजात टेस्टिंग सुरू होते त्यामुळे कान बधिर झाले तर लावल्या जाणाऱ्या लाइट्स मुळे डोळे दिपले. मग सावरकर उद्यानात राहणाऱ्या पक्ष्यांनी, सजीवांनी जायचे कोठे, तेथील जे सजीव आहेत ज्यांच्याकरिता ही उद्याने हीच खरंतर हक्काची राहण्याची जागा आहे त्यांनी काय करायचे? आपण अशा जागी आवाज आणि लाइट प्रदूषण होईल अशा कार्यक्रमांना परवानगीच का देता? पर्यावरण हे लोणचे नव्हे जे तोंडाला लावायला म्हणून वापरावे हे परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांना कधी समजणार? एकीकडे जैवविविधता वाढीसाठी आम्ही जीवाचे रान करत आहोत आणि तुम्ही अशी बेपर्वाई कशी दाखवू शकता?
ह्या आणि अशा इतर जागा ज्या संवेदनशील आहेत त्यांची परवानगी ताबडतोब रद्द करून आपली धोरणे खरोखर जैवविविधता राखण्यास कटिबद्ध असल्याचे शहराला दाखवून द्यावे असे आपणांस आवाहन आहे.
कळावे…

आपला विश्वासू,

धनंजय शेडबाळे, विश्वस्त, देवराई फाउंडेशन.