गरबा उत्सव मंडळाच्या मंडपात वराह देवतेचे (वराह प्राणी) फोटो लावून येणाऱ्याकडून पूजन करवून घेत प्रवेश द्यावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. यामुळे नवरात्र सुरु होण्यापूर्वीच वाद उद्भवण्याची शक्यता आहे. नवरात्रात गरबा उत्सवासाठी विश्व हिंदू परिषदेची (VHP) ही नवी मागणी वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने गरब्याच्या ठिकाणी बिगरहिंदूंना प्रवेश देण्यात येऊ नये, असा पवित्रा घेतला आहे. त्यादृष्टीने आगमी नवरात्रौत्सवात उपाययोजना करण्याची तयारी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.
नवरात्रात गरबा उत्सव मंडळात येणाऱ्या प्रत्येकाचे आधार कार्ड पाहून, त्या व्यक्तीचा धर्म तपासूनच आत मध्ये प्रवेश देण्यात यावा. प्रवेश घेणाऱ्याच्या मस्तकावर टिळा लावण्यात यावा. तसेच देवी मातेचा पूजन करायला लावण्यात यावं, या विश्व हिंदू परिषदेच्या नेहमीच्या मागण्यांशिवाय यंदा विहिंपने गरबा उत्सव मंडळाच्या मंडपात आयोजकांनी वराह देवतेचा (वराह) फोटो लावण्याची आणि त्याच पूजन करायला लावण्याची अपेक्षा ठेवली आहे. काही विधर्मी वराहपासून घृणा करतात, त्यामुळे वराहदेवतेचा चित्र पाहून ते गरबा उत्सव मंडळापासून दूर राहतील, असा तर्क विहिंपने आपल्या या मागणीच्या समर्थनार्थ समोर ठेवला आहे.
मुस्लिम तरुणांना डीवचण्यासाठी अशी मागणी करणे योग्य आहे का, असा प्रश्न विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना विचारला. तेव्हा वराह देवता आणि नवरात्राचा तसा धार्मिक संबंध नसला, तरी ते आमचे देवता आहे, ते अवतार आहे आणि काही विधर्मी चे वराह दर्शन केल्याने धर्म नष्ट होते, त्यांचा धर्म खंडित होतो असा त्यांचा समज आहे, म्हणून आम्ही तशी अट घातल्याचा विश्व हिंदू परिषदेकडून सांगण्यात आले. जे हिंदू धर्माला मानत नाही मूर्ती पूजेला मानत नाही, देवी मातेला मानत नाही, त्यांनी गरबा स्थळी प्रवेशच कशाला करावं, म्हणून आम्ही अशा सर्व अटी अट घातल्याचे विश्व हिंदू परिषदेचे म्हणणे आहे.













































