दि.१९(पीसीबी)-भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरुन आता राज्यातील वातावरण तापलं आहे. या वक्तव्याचे पडसाद सर्वत्र उमटू लागले असून ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. आता याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर फोन करुन चांगलाच दम भरल्याचे पाहायला मिळत आहे. स्वत: गोपीचंद पडळकर यांनी याबद्दलची माहिती दिली.
गोपीचंद पडळकर यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याची माहिती दिली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मला फोन आला होता. त्यांनी मला अशी वक्तव्य करु नका, अशी सक्तीची सूचना मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मी त्यांच्या सूचनेचे पालन करेन. मला मुख्यमंत्र्यांनी ज्या सूचना दिल्या आहेत, त्यांचं मी यापुढे पालन करणार आहे, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
गोपीचंद पडळकर काय म्हणाले होते?
गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या वडिलांचाही अपमान केला. अरे जयंत पाटला तुझ्या सारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात कार्यक्रम करायची ती धमक आहे. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. एवढ्या खालच्या लेव्हलला? आता माझा दांडीयाचा कार्यक्रम आहे. ये बघायला. तुझे डोळे दिपून जातील कार्यक्रम बघून, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती. त्यावर सध्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रींवर खालच्या शब्दात टीका केली होती, तेव्हा मी त्यांना फोन केला होता का, हे मी पाहिलं नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा एक AI व्हिडीओही तयार करण्यात आला आहे. तेव्हा पवारांनी मोदींना फोन करुन निषेध व्यक्त केला का, हे जरा कुठे असेल तर मला सांगा, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
दरम्यान याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट फोन केला होता. त्यांच्या आमदारांनी केलेल्या कृतीचा शरद पवारांनी निषेध व्यक्त केला. ज्या खालच्या थराला जाऊन टीका होत आहे, ती काही महाराष्ट्राची संस्कृती नाही. अशा वाचाळवीरांना, खालच्या पद्धतीने टीका करणाऱ्यांना आवरा असंही शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं.