दि.१९(पीसीबी)-अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित ‘राष्ट्रवादी चिंतन शिबिर’ यामध्ये सहभागी होऊन राष्ट्रवादी परिवाराशी मनमोकळा, आपुलकीचा संवाद साधला. यावेळी मान्यवर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांना संबोधित करताना पक्ष सक्षमीकरणाच्या, बळकटीकरणाच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शन केलं. काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आणि पक्षाचा अध्यक्ष या नात्याने सर्वांचं मनापासून स्वागत केलं.
पवार म्हणाले, पक्षाची भूमिका, ध्येय-धोरणं यांवर विचारविनिमय करण्यासाठी हे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. सर्वांना समान जागा, समान सन्मान देणारा पक्ष म्हणजे आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. राष्ट्रवादी हा कुठल्याही जात, धर्म, पंथाचा पक्ष नाही. हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर, स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांची विचारसरणी घेऊन आपण पुढं चाललो आहोत. हे शिबिर फक्त स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी नसून हा पुढच्या पिढ्यांचा रोडमॅप आहे. त्या दृष्टिकोनातून ज्येष्ठ मंडळी आपल्या दीर्घ अनुभवातून मार्गदर्शन करतील, युवा वर्ग आपला नवीन दृष्टिकोन मांडेल.
भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राची रचना निरनिराळी आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई-ठाणे-पालघर या भागांतील तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार प्रश्न वेगळे आहेत. याचा अभ्यास करून ‘नागपूर डिक्लरेशन’ अहवाल पक्षाच्या वतीनं देशासमोर मांडला जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.
प्रत्येक पदाधिकाऱ्यानं जनतेशी थेट संपर्क ठेवला पाहिजे. बुथ मिटिंग, प्रभारी सभा, जनसंवाद शिबिरं, महिला बचतगट, तरुणांसोबत टाउनहॉल, रोजगार शिबिरं अशा उपक्रमांनी आपण वर्षभर लोकांच्या थेट संपर्कात राहिलं पाहिजे. अशा पद्धतीनं चांद्यापासून बांद्यापर्यंत पक्ष संघटन मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.