पिंपरी,दि.१९(पीसीबी) राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याद्वारे नुकतेच राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपट्टी आणि मालमत्ता कराची ५ कोटींची थकबाकी वसूल झाली आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष व आकुर्डी दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकअदालत पार पडली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत पाणीपट्टी व मालमत्ता कर थकबाकीदारांना ऑनलाइन नोटिसा पाठवल्या होत्या. लोकअदालतीमध्ये पाणीपट्टी आणि मालमत्ता कराशी संबंधित एकूण ३ हजार ४२४ प्रकरणे निकाली निघाली असून तब्बल ५ कोटी १४ लाख १६० रुपयांचा महसूल संकलित झाला आहे. या लोकअदालतीकरिता नोटिसा पाठवलेल्या मालमत्ताधारकांनी थकबाकीसह चालू वर्षाचा मालमत्ता कराचा भरणा केला आहे. तसेच ज्या मालमत्ताधारकांनी ऑनलाइन स्वरूपात मालमत्ता कराचा भरणा केला आहे, त्यांना चालू वर्षाच्या सामान्य करावरील चार टक्के सवलतीचा लाभ मिळाला आहे.
थकबाकीदारांकडून झालेली वसुली
– २ हजार ४८१ पाणीपट्टी थकबाकीदारांकडून ३ कोटी १४ लाख १९ हजार रुपयांचा कर वसूल झाला आहे.
– ९४३ मालमत्ता कर थकबाकीदारांकडून २ कोटी २ हजार रुपयांचा मालमत्ता कर संकलित झाला आहे.
– यामध्ये ८३४ मालमत्ताधारकांनी ऑनलाइन स्वरूपात मालमत्ता कर भरून ४ टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे.
– लोकअदालतीसाठी कर संकलन विभागामार्फत पाणीपट्टी व मालमत्ता कर थकबाकीदारांना ऑनलाइन स्वरूपात मेसेजद्वारे नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या.
– ‘अ’ प्रभागातील पाणीपट्टी थकबाकीदारांकरिता आकुर्डी फौजदारी व दिवाणी न्यायालय व क्षेत्रीय कार्यालयात तसेच मालमत्ता कर थकबाकीदारांकरिता कर संकलन विभागीय कार्यालय या ठिकाणी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
– या लोकअदालतीकरिता थकबाकीदारांना थकबाकी ऑनलाइन पद्धतीने तसेच जवळच्या विभागीय कार्यालयात/क्षेत्रीय कार्यालयात भरण्याची सुविधा देण्यात आली होती.
लोकअदालतीत मालमत्ता कराची मोठ्या प्रमाणावर थकबाकी वसूल झाली असून महापालिकेच्या महसुलात मोठी वाढ करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम खूप महत्त्वाचे ठरतात. या पुढेही प्रत्येक थकबाकीदारापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही अधिक प्रभावी मोहिमा राबवणार आहोत. तसेच वारंवार संधी देऊनही थकबाकी न भरणाऱ्या मालमत्ताधारकांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
लोकअदालतीच्या माध्यमातून थकबाकी वसूल होण्यास मदत झाली आहे. यासाठी पाणीपट्टी तसेच कर आकारणी व कर संकलन विभागाच्या कर्मचारीवर्गाने यशस्वीपणे नियोजन केले होते.
– अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका