दि.१७(पीसीबी) -शिवाजी पार्क परिसरात काहीशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. अज्ञात व्यक्तीने मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शिवसैनिकांनी पुतळ्याची साफसफाई केली आहे. पोलिस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत. दादरच्या शिवाजी पार्कवरील पुतळ्याशी संबंधित ही घटना घडली आहे. काल रात्री कोणीतरी हा लाल रंग टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा लाल रंग नेमका कोणी टाकला याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. ठाकरे गटाकडून यासंदर्भात तक्रार आल्यास तक्रार दाखल करण्यात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
ठाकरे गटाकडून तक्रार न झाल्यास पोलीस स्वतः तक्रार दाखल करणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची पत्नी मीनाताई ठाकरे यांना शिवसैनिक प्रचंड मानायचे. 1995 साली मीनाताई ठाकरे यांचे निधन झाले होते. त्यानंतर शिवाजी पार्क परिसरात त्यांचा अर्धकृती पुतळा उभारण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून हा पुतळा याठिकाणी आहे. सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांना यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. त्यामध्ये एक व्यक्ती दिसत आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध सुरु केला आहे.
कोणीतरी सकाळच्या सुमारास पुतळ्याच्या जवळ लाल रंग टाकण्याचा प्रयत्न केला आहे घटनास्थळी शिवसैनिक जमले आहेत. काही शिवसैनिक पुतळ्याच्या आजूबाजूची साफसफाई करताना दिसून येत आहेत. या घटनेची माहिती मिळताच तातडीने या ठिकाणच्या स्थानिक आमदार, खासदार, काही शिवसैनिक परिसरात दाखल झाले. जमलेल्या शिवसैनिकांनी साफसफाई सुरू केले. पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना सहा ते साडेसहाच्या दरम्यान घडली आहे. सकाळी त्या आधी असं काहीच नव्हतं. आजूबाजूचा लाल रंग शिवसैनिकांनी पुसून काढला आहे. शिवसैनिकाने आजूबाजूचा लाल रंग पुसत साफसफाई केली. तिथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी माहिती देताना सांगितलं की, सकाळी आठ वाजता फोन आला त्यानंतर आम्ही घटनास्थळी दाखल झालो. आम्ही फोटो काढले आणि थीनर आणून साफसफाई सुरू केली. हे सगळं कोणी केलं याबाबतची माहिती समोर आलेले नाही. दरम्यान अनिल देसाई यांनी समाजकंटकाने हे सर्व कारस्थान केल्याचा संशय व्यक्त केला.
या घटनेवर अनिल देसाईंनी काय म्हटलं?
खासदार अनिल देसाई यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, अशा भेकडांच्या औलादींना कुठले संस्कार झालेले नसतील, यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. जे व्हायचं ते होईल, अशा प्रवत्तींना सरकार यंत्रणा काय करत आहेत. आज या ठिकाणी काय चाललंय याचा निषेध व्यक्त करण्याच्या पलिकडच्या या गोष्टी आहेत. हे सरकारचं अपयश आहे. हे प्रत्येक घटनेतून दिसत आहे. आमच्या पध्दतीने आम्ही करतो आहे. याची माहिती उध्दव ठाकरेंना देण्यात आली आहे. ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतोय, भेकड्यांना आणि समाजकंटकांना याच प्रत्युत्तर मिळेल. याबाबतचा तपास सुरू आहे. घटनास्थळाचा रंग हटवला आहे. संपूर्ण परिसर स्वच्छ झाला आहे. मुंबई सुरक्षित नाही, सरकार काय करत आहे, सरकार कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे, असंही खासदार अनिल देसाई यांनी म्हटलं आहे.
स्थानिक आमदार महेश सावंत यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितलं की, आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आम्हाला या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक शिवसैनिक घटनास्थळी दाखल झाले. त्याच वेळी पोलिसही दाखल झाले होते. पोलिसांच्या माहितीनुसार सकाळी 6.10 वाजेपर्यंत सर्व काही व्यवस्थित असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहे. याचा अर्थ ही घटना सकाळी 6.10 वाजल्यानंतर झाली असावी अशी माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी दुपारपर्यंत आरोपीची माहिती समोर येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.बुलढाण्यातील ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक मुंबईतील शिवाजी पार्क परिसरातील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकून अज्ञाताने पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला याच्या निषेधार्थ बुलढाण्यातील ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले असून थोड्याच वेळात ते निषेध आंदोलन करणार आहेत.