पिंपरी, दि. १६ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शासनाच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे विशेष सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शहरातील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना, स्वदेशी विचारसरणी, आत्मनिर्भरतेची जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी निर्माण व्हावी, या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये निबंधलेखन, वक्तृत्व स्पर्धा, नाट्यप्रयोग, भूमिका-अभिनय, प्रश्नमंजुषा, संगीतगायन, काव्यवाचन, कथाकथन, घोषवाक्यलेखन आणि चित्रकला अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि सर्जनशील क्षमतेला चालना मिळावी, तसेच त्यांना सामाजिक, राष्ट्रीय आणि जागतिक विषयांवर विचार करण्यास प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे नियोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत.
गटनिहाय स्पर्धेचे विषय
इयत्ता ३ री ते ५ वी
या गटातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे विषय “माझा भारत देश महान”, “स्वच्छ भारत – सुंदर भारत”, “पर्यावरण वाचवा – जीवन वाचवा”, “स्वदेशी वस्तूंचे महत्त्व”, “माझे स्वच्छ व सुंदर गाव / शाळा”, “भारतीय संस्कृती आणि सण” आणि “क्रीडा, खेळ यांचे महत्त्व” हे आहेत.
इयत्ता ६ वी ते ८ वी
या गटातील विद्यार्थ्यांसाठी “आत्मनिर्भर भारत – माझी भूमिका”, “पर्यावरण रक्षण – माझी जबाबदारी”, “स्वदेशी वस्तूंचा वापर – काळाची गरज”, “ऑपरेशन सिंदूर – राष्ट्रीय सुरक्षा”, “राष्ट्रप्रथम – विद्यार्थी म्हणून माझे कर्तव्य”, “आत्मनिर्भर भारत”, “स्वातंत्र्योत्तर भारताची प्रगती”, “स्वातंत्र्यलढा आणि आधुनिक भारताची निर्मिती”, “भारतीय लोकशाही व संविधानाची भूमिका”, “जागतिक स्तरावर भारताची भूमिका” आणि “भारतीय ज्ञानप्रणाली” यासारखे विषय देण्यात आले आहेत.