शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी राजेश वाबळे; जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर

0
11

जिल्हा समन्वयकपदी बाळासाहेब वाल्हेकर; जिल्हा संघटिकापदी शिलाताई भोंडवे

दि.१६(पीसीबी) -आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर प्रमुखपदी राजेश वाबळे यांची वर्णी लागली आहे. पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयकपदी बाळासाहेब वाल्हेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा संघटिकापदी शिलाताई भोंडवे यांची नियुक्ती केली आहे.

उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या केल्या आहेत. याबाबतची माहिती शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी दिली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. गण, गट, प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना पूर्ण ताकदीने लढणार आहे. त्यादृष्टीने संघटना बांधणी, नियोजन सुरू आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनेतही बदल करण्यात आले आहेत. जिल्हाप्रमुख असलेले बाळासाहेब वाल्हेकर यांच्याकडे पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयकपदाची जबाबदारी सोपविली आहे. मावळ तालुकाप्रमुख असलेले राजेश खांडभोर यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

उपजिल्हाप्रमुख असलेले राजेश वाबळे यांची पिंपरी-चिंचवड महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघाच्या जिल्हा संघटिकापदी शिलाताई भोंडवे यांची नियुक्ती केली आहे. तर, मावळ तालुकाप्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबत शिवसेनेचे उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेत संघटनात्मक बदल केले आहेत. शिवसेना पुणे जिल्ह्यातील सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढणार आहे. नवीन पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ लोकसभा मतदारसंघात संघटना आणखी मजबूत होईल. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, महापालिकेत शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी झपाटून कामाला लागावे. केंद्र, राज्य सरकारचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचववेत. राज्य सरकारच्या योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून द्यावा.