पानिपतकार विश्वास पाटील यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी

0
4

यंदाच्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात पार पडणार आहे. पुण्यात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये पार पडलेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीवेळी सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये साहित्य महामंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला महामंडळाचे चारही घटक संस्थांचे तसेच संलग्न आणि समाविष्ट संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत अध्यक्षपदासाठी विविध संस्थांनी विविध नावे सुचवली होती. या सुचवलेल्या नावांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर बहुतांश सदस्यांनी विश्वास पाटील यांच्या नावावर सहमती दर्शवली. त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

मराठा साम्राज्याची एकेकाळची राजधानी असलेल्या सातारा येथे होणारे आगामी साहित्य संमेलन होणार आहे. यंदाचे हे संमेलन शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर आहे. याच अनुषंगाने पानिपत या ऐतिहासिक कादंबरीसाठी प्रसिद्ध असलेले विश्वास पाटील यांची संमेलनाध्यक्षपदी निवड होणे, हा एक अनोखा योगायोग मानला जात आहे. या निवडीमुळे मराठी साहित्यविश्वात आनंदाचे वातावरण आहे. विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणारे हे संमेलन विशेष महत्त्वाचे ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विश्वास पाटील हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य नाव आहे. त्यांची ओळख प्रामुख्याने ‘पानिपत’ या ऐतिहासिक कादंबरीमुळे आहे. ही कादंबरी मराठी साहित्यातील एक मैलाचा दगड मानली जाते. या कादंबरीमध्ये त्यांनी मराठ्यांच्या पानिपतच्या युद्धातील शौर्य आणि करुण प्रसंगांबद्दल लेखन केले आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक ऐतिहासिक कादंबरी लिहिल्या आहेत. सखोल संशोधन आणि प्रभावी भाषाशैली हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्ये आहे. त्यांच्या साहित्यकृतींनी मराठी साहित्याला एक नवी उंची प्राप्त करून दिली आहे. आता ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली हे संमेलन मराठी साहित्याला नवी दिशा देईल, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी साहित्यविश्वातील सर्वात मोठे आणि प्रतिष्ठित व्यासपीठ मानले जाते. दरवर्षी आयोजित होणाऱ्या या संमेलनात देशभरातील मराठी साहित्यिक, कवी, लेखक आणि वाचक एकत्र येतात. या व्यासपीठावर साहित्यिक विचार, नवनवीन संकल्पना आणि कलाकृतींवर सखोल चर्चा-विनिमय होतो. यंदाचे ९९ वे संमेलन शतकपूर्तीच्या जवळ पोहोचले आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. अशा ऐतिहासिक टप्प्यावर, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वाच्या नेतृत्वाखाली हे संमेलन मराठी साहित्याला एक नवी आणि सकारात्मक दिशा देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.