पीसीईटी मध्ये १९ व्या स्मृतिदिनानिमित्त एस. बी. पाटील यांना अभिवादन
पिंपरी, दि. १४ – संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर राज्याच्या कृषी, औद्योगिक विकासावर भर देण्यात आला. तो काळ १९६० चा होता. त्यावेळी यशवंतराव चव्हाण, आचार्य अत्रे, केशवराव जेधे यांच्या दूरदृष्टी नेतृत्वासोबत शंकरराव बाजीराव पाटील ऊर्फ भाऊ यांनी जबाबदारीने कार्य केले. भाऊंनी रोजगार हमी योजनेतील कामगारांना वेतन आणि धान्य देण्याचा निर्णय, कामगारांना किमान वेतन मिळाले पाहिजे, शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या धान्याला योग्य दाम मिळावे यासाठी राज्याला नव्हे तर संपूर्ण देशाला दिशा देणारे कायदे विधीमंडळात संमत करून घेतले. भाऊंच्या कार्याची चुणूक महाराष्ट्राला पहायला मिळाली. भाऊंनी सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. याचे अनुकरण आजच्या काळात केले पाहिजे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत ज्येष्ठ पत्रकार, संपादक मधूकर भावे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) संस्थापक अध्यक्ष स्व. शंकरराव बाजीराव पाटील यांच्या १९ व्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी (१३ सप्टेंबर) पीसीईटीच्या निगडी येथील सभागृहात मधूकर भावे यांचे “भाऊंचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी पीसीईटीच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयु अभ्यास मंडळाचे सदस्य सचिन इटकर उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील सर्वसामान्य जनतेच्या मुलांना दर्जेदार उच्च शिक्षण मिळावे, या उद्देशाने भाऊंच्या नेतृत्वाखाली पीसीईटी एज्युकेशन ट्रस्टची स्थापना करण्यात आली. छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले, हे पाहून आनंद वाटतो, असे विठ्ठल काळभोर यांनी प्रास्ताविकात सांगितले.
भाऊंचा १९६१ ते १९७८ हा विधानसभेतील काळ मला जवळून पाहता आला. ते सहा वेळा आमदार झाले. १९५७ मध्ये पश्चिम महाराष्ट्रात कॉग्रेसची धुळधाण उडाली मात्र भाऊ पाच हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले, अशी आठवण भावे यांनी यावेळी सांगितली.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सूत्रसंचालन माधुरी ढमाले यांनी केले. पीसीईटी शैक्षणिक समुहातील सर्व संस्था, महाविद्यालये, शाळांचे प्राचार्य, संचालक, प्राध्यापक, कर्मचारी व्याख्यानास उपस्थित होते.
“श्रीमंतीची वाटणी म्हणजे समाजवाद”
मुठभर व्यक्तींच्या हातात पैसा आणि सत्ता असणं योग्य नाही. सत्तेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. श्रीमंतीची गोरगरिबांमध्ये वाटणी झाली पाहिजे. हा खरा समाजवाद आहे, असे भाऊंचे ठाम मत होते, असे मधूकर भावे यांनी सांगितले.
समाजाला दिशा देण्याचे कार्य शंकरराव (भाऊ) बाजीराव पाटील यांनी केले आहे. नवीन पिढीला त्यांच्या कार्याची ओळख व्हावी. त्यांचे कार्य महाराष्ट्रासमोर आले पाहिजे. यासाठी भाऊंचे पुस्तक प्रकाशित करणार असल्याचा मनोदय मधूकर भावे यांनी व्यक्त केला.