- खेळाडूंचा विरोध, जय शहा यांच्या दबावामुळेच सामना
आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान आज 14 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये आमनेसामने येणार आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही संघ पहिल्यांदाच भिडणार असून संपूर्ण देशभरातून या सामन्याला विरोध होत आहे. हा सामना रद्द करण्याची मागणी देखील केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून या सामन्याच्या विरोधासाठी आज राज्यभरात ‘माझं कुंकू, माझा देश’ आंदोलन करण्यात येत आहे. आता या सामन्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारसह भारतीय खेळाडूंवर जोरदार हल्लाबोल केलाय. दरम्यान, या मॅचसाठी तब्बल दीड लाख कोटींचा सट्टा लावण्यात आल्याचा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, मोदी-शाहांची ही राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे. पहलगाम हल्ल्यात ठार झालेल्या 26 लोकांच्या बायकांच्या कपाळावरचा सिंदूर पुसला गेला. मोदींनी छाती पिटण्याचा कार्यक्रम केला. भारताने याआधी अशा आंतरराष्ट्रीय सामन्यातून माघार घेतली आहे. पण जय शहा यांचा त्यात इन्ट्रेस्ट आहे. मोदींना कोणतीही नैतिकता राहिलेली नाही. भाजप के पापा वॉर रुकवा सकते है, मगर मॅच नही रोक सकते है. ट्रम्प के दबाव मै, हिंदुस्तान पाकिस्तान का वॉर भी रोक सकते है, हा नक्की असा कोणता पैशाचा खेळ आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या सामन्याच्या विरोधात आंदोलनाची व्याप्ती देशभरात पसरली आहे. काल आपने दिल्लीत आंदोलन केलं. आज पण आंदोलनं होतील. सौरभ द्विवेदींच्या पत्नीचा आक्रोश ऐका. तुमची अशी काय मजबूरी आहे की, सामना खेळावा लागतोय. भारत-पाक सामन्याच्या विरोधापासून लक्ष हटवण्यासाठी मोदींनी मणिपूर दौरा केला, असे म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय.
संजय राऊत पुढे म्हणाले की, हा सामना खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना लाजा वाटल्या पाहिजे. त्यांच्या मनात राष्ट्रभक्ती नाही का? मॅच खेळले नसते तर जय शाह फासावर लटकवणार होते का? आशियाई क्रिकेट काऊन्सिलचे अध्यक्ष मोहसीन नखवी आहेत. त्यांच्या हाताखाली आशिष शेलार काम करतात. नैतिकतेच्या दृष्टीने त्यांनी राजीनामा दिला पाहिजे होता. अमित शाह आम्हाला शिकवणार? अमित शाह, एकनाथ शिंदेंना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. बाळासाहेब असते तर दुबईचा आजचा सामनाही झाला नसता, असेही त्यांनी म्हटले.
भारतीय क्रिकेट संघाला हा सामना खेळायचा नाही. त्यांच्यावर जय शाहांचा दबाव आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनी सामना खेळू नये, असे म्हटले आहे. पण मोदींचे सरकार निर्लज्ज सरकार आहे. भारतीय क्रिकेट संघाने बाहेर पडावे आणि राष्ट्रभक्ती दाखवावी. आजच्या मॅचसाठी दीड लाख कोटींचं गॅम्बलिंग झालं आहे, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केलाय.