दि. १३(पीसीबी)– नाव, जन्मतारीख, पत्ता सगळं एकच… पण एकाच व्यक्तीने सहा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सरकारी नोकरी केली तर? हे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही, पण उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागात असाच एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणामुळे अनेक मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत एका नियुक्ती पत्रावर सहा जिल्ह्यांमध्ये एकाच व्यक्तीच्या ओळखीवर नोकरी कशी सुरू होती? इतकंच नव्हे, तर या काळात सरकारी वेतनातून कोट्यवधी रुपये उचलल्याचं समोर आलं आहे.
कोण आहे अर्पित सिंह?
अर्पित सिंह, ज्यांचं नाव गेल्या ९ वर्षांपासून एक्स-रे टेक्निशियन म्हणून नोंदलेलं होतं, त्यांनी दर महिन्याला लाखो रुपये वेतन आणि शासकीय सुविधा घेतल्या. मात्र जेव्हा मानव संपदा पोर्टलवर त्यांची नोंदणी झाली, तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला.मे २०१६ मध्ये, आरोग्य विभागात एक्स-रे टेक्निशियन पदासाठी भरती झाली होती.एकूण ४०३ पदे भरली गेली.अर्पित सिंह यांचा सीरियल नंबर ८० आणि नोंदणी क्रमांक 50900041299 होता. त्यांच्या वडिलांचे नाव – अनिल कुमार सिंह, जन्मतारीख – १९८९ अर्पित यांची तैनाती हाथरस जिल्ह्यातील मुरसान येथे झाली होती.मानव संपदा पोर्टलवर जेव्हा नोंदणी सुरू झाली, तेव्हा असे सहा अर्पित सिंह वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत असल्याचे लक्षात आले –
फर्रुखाबाद, बांदा, बलरामपूर, बदायूं, रामपूर, आणि शामली विशेष म्हणजे, या सहा अर्पित सिंह यांचं नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख अगदी एकसारखी होती.
यापैकी चार जणांचे कायमचे पत्तेही पूर्णपणे एकसारखे होते.एका जिल्ह्यात अर्पित सिंह दर महिन्याला ₹69,595 वेतन घेत होता.एका वर्षात एका जिल्ह्यातून त्याने ₹8,35,140 वेतन घेतले. ९ वर्षांमध्ये फक्त एक जिल्हा गृहित धरून त्याने ₹75,16,260 उचलले. जर सहा जिल्ह्यांचा विचार केला, तर एकूण ₹4 कोटी 50 लाखांपेक्षा अधिक रक्कम वेतनाच्या स्वरूपात उचलली गेली!
फर्रुखाबादचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) यांनी या प्रकरणावर तीन उपमुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम नेमली आहे.कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र प्रश्न असा आहे की, ही कारवाई केवळ कागदोपत्री नियमांपुरती मर्यादित राहणार का, की खरंच व्यवस्थेच्या मुळांपर्यंत जाऊन दोषींवर कठोर कारवाई केली जाणार?या प्रकारामुळे उत्तर प्रदेशच्या आरोग्य यंत्रणेतील फसवणूक, फसवेगिरी आणि कामकाजातील निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. एका नावावर सहा नोकऱ्या चालू असतील, आणि यंत्रणेला कळतही नसेल – तर ही केवळ अर्पितची चाल नव्हे, ही संपूर्ण व्यवस्थेची चूक आहे.