मुंबई, दि.११(पीसीबी) – महाराष्ट्र राज्याचे सामाजिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री माननीय प्रकाशजी आबिटकर यांची मंत्रालय, मुंबई येथे आज विशेष भेट घेण्यात आली. या भेटीत आयुर्वेद वैद्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीसाठी मर्म संस्थेचे अध्यक्ष वैद्य अजित राजिगरे यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच निमा आयुर्वेद फोरम सेंट्रल कौन्सिल चे अध्यक्ष वैद्य निलेश लोंढे, खजिनदार वैद्य महेश पाटील, सभासद वैद्य सागर अर्डक, ग्लोबल आयुर्वेद प्रॅक्टिशनर असोसिएशन चे अध्यक्ष वैद्य विक्रांत पाटील, खजिनदार वैद्य श्याम जगताप, निमा महाराष्ट्र आयुर्वेद फोरम चे अध्यक्ष वैद्य अमोल ठवळी, निमा पिंपरी चिंचवड अध्यक्ष व निमा सेंट्रल कौन्सिल प्रवक्ता डॉ. प्रताप सोमवंशी तसेच महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन आणि आयुर्वेद व्यासपीठ यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी आयुर्वेद डॉक्टर व आमदार किरण लहामटे यांनाही निवेदन देण्यात आले.
मुख्य मागण्या
आयुर्वेद क्लिनिक, पंचकर्म सेंटर व आयुर्वेद हॉस्पिटल यांना बॉम्बे नर्सिंग अॅक्ट आणि बायो-मेडिकल वेस्ट नियमावलीत बदल करण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे :
1. नोंदणी प्रक्रिया वेगळी असावी – आयुर्वेद हॉस्पिटल ,क्लिनिक व पंचकर्म सेंटरमध्ये नर्सिंग स्टाफऐवजी प्रशिक्षित पंचकर्म थेरपीस्ट व पेशंट असिस्टंट स्टाफ आवश्यक आहे, त्यानुसार नियमांत तरतूद व्हावी.
2. बायो-मेडिकल वेस्ट चार्जेस कमी करावेत – आयुर्वेदिक उपचारांमधून अल्प प्रमाणात वेस्ट निर्माण होत असल्याने वेगळी व्यवस्था करावी.
3. MPCB सर्टिफिकेटसाठी सवलती – शुद्ध आयुर्वेद प्रॅक्टिस करणाऱ्यांसाठी स्वतंत्र तरतुदी व्हाव्यात.
4. आरोग्य योजना लाभ – राज्य कर्मचाऱ्यांसाठीच्या आरोग्य योजनांमध्ये व विमा पॉलिसी मध्ये आयुर्वेदिक उपचारांचा समावेश करावा व आयुर्वेद हॉस्पिटल्स इम्पॅनेल करावेत.
5. ‘आयुर्वेद व पंचकर्म’ शब्दाचा गैरवापर रोखावा – फक्त नोंदणीकृत वैद्यच हा शब्द वापरू शकतील. वेलनेस सेंटरमध्ये हा उपचार देत असल्यास अनिवार्यपणे वैद्यांची नेमणूक करावी.
6. ऑलोपॅथी हॉस्पिटलमध्ये आयुर्वेद युनिट उभारणीसाठीचे नियम – यासाठी स्वतंत्र नियम व नोंदणी प्रक्रिया निश्चित करावी.
या बैठकीत मंत्री महोदयांनी सर्व मागण्या ऐकून घेतल्या असून सकारात्मक तोडगा काढण्याबाबत आश्वासन दिले.
आयुर्वेदाच्या राजश्रयासाठी कार्यरत असलेल्या सर्व वैद्य आणि संघटनांचे यावेळी विशेष आभार मानण्यात आले.