नर्तकिच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या उपसरपंचाचा असा झाला शेवट

0
7

दि.१०(पीसीबी) -बीडच्या गेवराई जिल्ह्यातील लुखामसाला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (वय 34) यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी समोर आला. याबाबत आता नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. बीडच्या पारगाव कला केंद्रात नर्तकी असणाऱ्या पूजा गायकवाड (वय 21) हिच्याशी गेल्या दीड वर्षांपासून गोविंद बर्गे यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये बिनसले होते. पूजाने गोविंद बर्गे यांच्याकडून गेवराईतील बंगला नावावर करण्यासाठी तगादा लावला होता. तसे न केल्यास तुमच्यावर बलात्काराची तक्रार दाखल करेन, अशी धमकीही पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांना दिली होती.

गेल्या दीड वर्षात गोविंद बर्गे यांनी पूजाला प्रचंड जीव लावला होता. तिची प्रत्येक इच्छा पूर्ण केली होती. गोविंद बर्गे यांनी पूजाला पावणेदोन लाख रुपये किंमतीचा मोबाईल फोनही घेऊन दिला होता. तसेच तिला अनेक सोन्याचे दागिनेही दिले होते. गोविंद बर्गे हे पूजाच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र, त्याच पूजाने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याची गोष्ट गोविंद यांच्या मनाला खूपच लागली होती. त्यातच पूजाने गोविंद बर्गे यांच्याशी संपर्क पूर्णपणे तोडला होता. ती गोविंद बर्गे यांच्याशी बोलत नव्हती. त्यामुळे गोविंद बर्गे यांचे मन थाऱ्यावर नव्हते. ते सोमवारी रात्री बार्शी येथील पूजाच्या घरीही गेले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी गाडीत गोविंद बर्गे यांचा मृतदेह आढळून आला होता.

या घटनेविषयी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणात पूजा गायकवाड हिच्यावर बी एन एस कलम 108 नुसार वैराग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा आणि मृत गोविंद यांच्यात मागील दीड वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती आहे. गावाकडील घर नावावर कर, बार्शीत शेतजामीन घेऊन दे अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी त्या महिलेने दिली होती. त्या महिलेविरोधात नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. गोविंद बर्गे यांनी सोलापुरातील बार्शीत गोळी झाडून घेत आत्महत्या केली. बार्शी तालुक्यातील सासुरे गावाजवळ एका चारचाकी गाडीत बर्गे याने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.