दि.८ (पीसीबी) – हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची मराठा समाजाची मागणी मंजूर करण्यात आली होती. याचा मोठा फायदा मराठा समाजासोबत बंजारा समाजाला होण्याची शक्यता आहे. बंजारा समाज हा सध्या एनटी (ए) प्रवर्गात आहे. मात्र, हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात जाण्याची शक्यता आहे. मुंबईत बंजारा समाजाच्या एक उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे.
बैठकीला बंजारा समाजाचे सर्व धर्मगुरू, महंत, मंत्री संजय राठोड, इंद्रनील नाईक,सर्व आमदार, लोकप्रतिनिधी आणि बंजारा समाजातील अभ्यासक उपस्थित राहणार आहेत. या बदलावर समाजात मतांतरे असल्याने समाजाची बाजू समजून घेण्यासाठी ही महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगितले जाते. बंजारा समाज सध्या व्हीजेएनटी (ए) मध्ये आहे. हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाज हा एसटीमध्ये जाईल. बंजारा समाजाची आधीपासून मागणी होती की, त्यांना एसटीमधून आरक्षण मिळावे. ही मागणी प्रलंबित होती. हैदराबाद गॅजेटचा फायदा जसा मराठा समाजाला होईल तसा बंजारा समाजाला सुद्धा होईल.
‘हैद्राबाद गॅझेटीयर’वरून सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ‘हैद्राबाद गॅझेटीयर’च्या आधारावर बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याची समाजाची मागणी सुरु झाली आहे. जर ‘हैद्राबाद गॅझेटीयर’च्या आधारावर मराठा समाजाला ‘कुणबी प्रमाणपत्र’ मिळत असेल तर त्याच गॅझेटीयरमध्ये ‘आदिवासी’ उल्लेख असलेल्या बंजारा समाजावर अन्याय का?, असा प्रश्न बंजारा समाजाकडून उपस्थित करण्यात आला आहे. आजच्या मुंबईच्या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा निश्चित होईल. अनेक जिल्ह्यांमध्ये बंजारा समाजाकडून सरकारला आदिवासीतून आरक्षणासाठीचे निवेदन सरकारला पाठवण्यात आले आहे.
तत्कालीन निजाम सरकारच्या ‘हैद्राबाद गॅझेटीयर’मध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्ग म्हणून उल्लेख आहे. सध्या महाराष्ट्रात बंजारा समाजाला ‘विमुक्त भटक्या जमाती’ (Nomadic Tribe) NT प्रवर्गाचे आरक्षण. देशातील अनेक राज्यांमध्ये तेथील राज्य सरकारकडून बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश. आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीनंतर आता बंजारा समाजही ‘हैद्राबाद गॅझेटीयर’चा आधार घेत महाराष्ट्रात आरक्षणाचं आंदोलन तीव्र करण्याची शक्यता आहे.
हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी आता बीडमधून बंजारा समाजाने केली आहे. या मागणीला गेवराई मतदार संघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी पाठिंबा दर्शवीत ही मागणी हिवाळी अधिवेशनात करणार असल्याचं जाहीर केले. सध्या बंजारा समाज व्हीजेएनटी (ए) प्रवर्गात आहे. बीडच्या गेवराई येथे बंजारा समाजाची बैठक पार पडली आणि याच बैठकीतून बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याची मागणी केली जाते आहे. वेळ पडली तर रस्त्यावरची लढाई लढू असा इशारा देखील बैठकीतून देण्यात आला.
राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा अध्यादेश काढला आहे. याला इंदापूर मधून विरोध केला जातोय. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी इंदापूरमध्ये ओबीसी समाजाच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी आंदोलकांनी केली.
बंजारा समाजाला देखील हैद्राबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमातीमध्ये सहभागी करावे अशी मागणी समाजाच्यावतीने नांदेडमध्ये करण्यात आलीय. नांदेडच्या देगलूर इथल्या तहसीलदारांना बंजारा समाजाच्या वतीने निवेदन देत ही मागणी करण्यात आली. यावेळी बंजारा समाजाच्या वतीने जोरदार नारेबाजी करत लक्ष वेधून घेण्यात आले.