दि.४ (पीसीबी) -जीएसटी काउंसिलच्या 56 व्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेत जीएसटी परिषदेची बैठक झाली. या बैठकीत जीएसटी स्लॅब तीन ऐवजी दोन करण्यात आले आहेत. बैठकीनंतर निर्णयाची माहिती देताना अर्थमंत्री सितारामन म्हणाल्या, आम्ही स्लॅब कमी केले आहेत. आता फक्त दोन स्लॅब राहतील. तसेच आम्ही नुकसान भरपाई कराच्या मुद्द्यावरही विचार करत आहोत.
दरम्यान, नव्या निर्णयानुसार आता जीएसटीत 5 आणि 18 टक्के असे दोनच स्लॅब असतील. या व्यतिरिक्त एक स्पेशल स्लॅबही असेल. 12 आणि 28 टक्क्यांचे स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. हा निर्णय येत्या 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. देशातील सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून सरकारने हा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य माणूस रोज ज्या वस्तू वापरतो त्यावर आकारल्या जाणाऱ्या करांचा आढावा घेण्यात आला. या निर्णयाचा देशातील शेतकऱ्यांसह आरोग्य क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे असे सितारमन यांनी सांगितले.
या वस्तूंवर राहणार फक्त 5 टक्के जीएसटी
केसांचे तेल, टॉयलेट सोप, अंगाचा साबण, शाम्पू, टूथब्रश, टूथपेस्ट, सायकल, टेबलवेयर, स्वयंपाकगृहातील वस्तू, फरसाण, सॉस, पास्ता, चॉकलेट, कॉफी यांसह अन्य घरगुती वस्तूंवर जीएसटी कमी करण्यात आला आहे. आता या वस्तूंवर फक्त 5 टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे.
या वस्तू होणार जीएसटी फ्री..
या व्यतिरिक्त अल्ट्रा हाय टेम्परेचर मिल्क, छेना, पनीर, ब्रेड या वस्तूंवर कोणताच जीएसटी वसूल केला जाणार नाही. एसी, वॉशिंग मशीन, 38 इंचांपेक्षा जास्त आकाराचे टीव्ही, लहान कार यांसारख्या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. याआधी या वस्तूंवर 28 टक्के जीएसटी आकारण्यात येत होता.
काय स्वस्त अन् काय महाग होणार
कृषीविषयक उत्पादनांवरील 12 टक्क्यांचा जीएसटी आता 5 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. याव्यतिरिक्त मार्बल, लेदर या वस्तुंवरील जीएसीट देखील कमी करण्यात आला आहे.
सिमेंटवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात येणार आहे. हेल्थ उपकरणे आणि 33 प्रकारच्या औषधांवर कोणताही जीएसटी आकारला जाणार नाही. चष्मा आणि डोळ्यांशी संबंधित वस्तूंवर मात्र 5 टक्के जीएसटी राहील.
लक्झरी वस्तू, कार आणि दुचाकी आणखी महाग होणार आहेत. या वस्तू्ंवर स्पेशल स्लॅब आकारण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त तंबाखू, जर्दा, पान मसाला, फ्लेवर, फ्रुट ड्रिंक्स, अन्य पेय महाग असतील. 350 सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असणाऱ्या दुचाकी महागणार आहेत.
आरोग्य विमा आणि जीवन विमा पॉलिसींवरील जीएसटीत दिलासा मिळणार आहे. बूट आणि कपड्यांवरही जीएसटी कमी होणार आहे. या वस्तूंवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्के होणार आहे.
औषधे, तूप, लोणी या वस्तू स्वस्त होणार आहेत. या वस्तूंवर आधी 12 टक्के जीएसटी होता तो आता कमी करून 5 टक्के करण्यात येणार आहे.
जीएसटीतील संभाव्य बदल जाणून घ्या..
फूड अँड टेक्सटाइल्स
सध्याची जीएसटी 12 टक्के
प्रस्तावित जीएसटी 5 टक्के
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू
सध्याचा जीएसटी 28 टक्के
प्रस्तावित जीएसटी 18 टक्के
लहान कार
सध्याचा जीएसटी 28 टक्के
प्रस्तावित जीएसटी 18 टक्के
लक्झरी कार
सध्याचा जीएसटी 50 टक्के
प्रस्तावित जीएसटी 40 टक्के
औषधे
सध्याचा जीएसटी 12 टक्के
प्रस्तावित जीएसटी 5 टक्के
इन्शुरन्स
सध्याचा जीएसटी 18 टक्के
प्रस्तावित जीएसटी 5 टक्के
एफएमसीजी वस्तू (स्नॅक्स, ज्युस, केचअप)
सध्याचा जीएसटी 12 टक्के
प्रस्तावित जीएसटी 5 टक्के
सिमेंट
सध्याची जीएसटी 28 टक्के
प्रस्तावित जीएसटी 18 टक्के
सलून सर्व्हिस
सध्याचा जीएसटी 18 टक्के
प्रस्तावित जीएसटी 5 टक्के
सिनेना तिकीट
सध्याचा जीएसटी 12 टक्के
प्रस्तावित जीएसटी 5 टक्के