दि. २ (पीसीबी) -सोसायटीचे गेट बंद करत असताना तीन अनोळखी इसमांनी सुरक्षा रक्षकाला अडवले. त्यांनी जबरदस्ती आतमध्ये प्रवेश करत गणेश वर्गणीच्या नावाखाली पैशांची मागणी केली. ही घटना शुक्रवारी (२९ ऑगस्ट) रात्री गणेशम फेज-२ सोसायटी, पिंपळे सौदागर येथे घडली.या प्रकरणात व्यंकटी रामजी तेलंगे (४४, पिंपरी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन गोरख ओव्हाळ (४५, दापोडी), अजय चंद्रकांत ठोबरे (४०, दापोडी) आणि शुभम त्र्यंबक गायकवाड (२८, जुनी सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यंकटी तेलंगे, सुरक्षा रक्षक रामू होले आणि निलेश मेसरे हे पिंपळे सौदागर येथील गणेशम फेज दोन या सोसायटी मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. सोसायटीच्या मेन गेटवर ड्युटीवर असताना रात्री बारा वाजताच्या सुमारास सुरक्षा रक्षक होले गेट बंद करत असताना आरोपी बाहेरून आले आणि त्यांनी होले यांना गेट बंद न करण्याबाबत दमदाटी केली. आरोपींनी जबरदस्ती आतमध्ये प्रवेश केला. “आत्ताच्या आता चेअरमनला बोलवा आणि गणपती वर्गणी द्या” असे म्हणून आरोपींनी ‘शिवराजे मित्रमंडळ’ नावाच्या पावतीवर तीन हजार ५०० रुपये मागितले. तसेच फिर्यादीला ऑनलाईन माध्यमातून पैसे पाठवण्यास सांगितले. पैसे पाठवले नाही तर पुन्हा याच वेळेला येऊ अशी धमकी देत आरोपींनी फिर्यादीकडून १,००० रुपये रोख रक्कम खंडणी म्हणून घेतली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.