नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस तर्फे डीएनबी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी थेरगाव रुग्णालयाला मंजुरी
पिंपरी दि. ३० – (पीसीबी) नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) नवी दिल्ली यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयाला डीएनबी (जनरल मेडिसिन) पदव्युत्तर पदवी (Post Graduate Degree) अभ्यासक्रमासाठी २०२५ प्रवेश सत्राकरिता चार जागा मंजूर केल्या आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. पिंपरी चिंचवडसाठी हा एक ऐतिहासिक टप्पा आहे, असेही ते म्हणाले.
नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस नवी दिल्ली यांनी पदव्युत्तर पदवीका अभ्यासक्रमासाठी थेरगाव रुग्णालयात १२, आकुर्डी रुग्णालयात ८ व भोसरी रुग्णालयात २ अशा एकूण २२ जागांकरिता यापूर्वीच मान्यता दिली आहे. सदर अभ्यासक्रम संबंधित रुग्णालयांमध्ये सुरू देखील झालेले आहेत. तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात नॅशनल मेडिकल कौन्सिल तर्फे यापूर्वीच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहेत. याच धर्तीवर आता नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस नवी दिल्ली यांची पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी थेरगाव रुग्णालयास मान्यता मिळाल्यामुळे महापालिकेच्या आरोग्य सेवेला बळकटी मिळणार आहे.
नव्याने मिळालेल्या या मान्यतेमुळे नवीन थेरगाव रुग्णालयाचे शैक्षणिक व वैद्यकीय स्वरूप अधिक सक्षम होणार आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर रुग्णसेवा दिली जाते. विविध आजारांवरील उपचारासोबतच प्रगत निदान सुविधा येथे उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव, रुग्णसेवेत सक्रिय सहभाग आणि वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळाल्याने त्यांच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळेल. या प्रक्रियेतून रुग्णसेवेचा दर्जाही उंचावणार असून नागरिकांना अधिक परिणामकारक व तत्पर आरोग्यसेवा मिळेल. नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस नवी दिल्ली यांच्या अभ्यासक्रमामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेची रुग्णालये केवळ आरोग्यसेवा पुरविण्यापुरती मर्यादित न राहता वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षणासाठी एक महत्त्वाचे केंद्र म्हणूनही विकसित होणार आहेत. या माध्यमातून वैद्यकीय विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने वैद्यकीय ज्ञान आत्मसात करण्याची व भविष्यातील आरोग्यसेवेत महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी उपलब्ध होईल.
पिंपरी चिंचवड महापालिका आपल्या आरोग्य यंत्रणेत सातत्याने सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. उच्च दर्जाची आरोग्यसेवा, आधुनिक सुविधा आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासोबतच शैक्षणिक व संशोधनाच्या संधी निर्माण करणे हा महापालिकेचा उद्देश आहे. नवीन थेरगाव रुग्णालयाला डीएनबी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी मान्यता मिळाल्याने आपल्या रुग्णालयांची विश्वासार्हता आणि क्षमता अधोरेखित झाली आहे. वैद्यकीय शिक्षणाच्या माध्यमातून भविष्यातील कुशल डॉक्टर्स तयार होणार असून यामुळे नागरिकांना अधिक उच्च गुणवत्तेची आरोग्यसेवा मिळण्यास मदत होईल.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका
थेरगाव रुग्णालयाला मिळालेली ही मान्यता म्हणजे अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण परिश्रमाचे फलित आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, वैद्यकीय क्षेत्रातील व्यावहारिक अनुभव आणि तज्ज्ञ मार्गदर्शन यांचा लाभ होईल. या प्रक्रियेतून रुग्णसेवा अधिक सक्षम होईल तसेच शैक्षणिक व संशोधन कार्यालाही चालना मिळेल.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका