पुणे, दि. २८ : ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो आंदोलक जालन्याहून मुंबईकडे निघाले आहेत. जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावखेड्यातून तरुणांसह वृद्ध नागरिक अन् महिलाही मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघारी फिरायचं नाही, अशा निर्धाराने हे आंदोलक मुंबईच्या दिशने वाटचाल करत आहेत. मात्र मनोज जरांगे पाटील यांचा हा मोर्चा पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ आल्यानंतर एक दुर्दैवी घटना घडली आहे. या मोर्चात सहभागी असलेल्या सतीश देशमुख या आंदोलकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे बीडचे असलेले आणि सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले सतीश देशमुख हे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी मोर्चात सहभागी झाले होते. परंतु जरांगे आणि त्यांच्या समर्थकांचा ताफा जुन्नर तालुक्याजवळ आल्यानंतर सतीश देशमुख यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. काही क्षणांतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. ही बातमी पसरताच मोर्चेकऱ्यांवर शोककळा पसरली आहे.