आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित संपर्क व जलद प्रतिसादासाठी नियंत्रण कक्ष अधिक सक्षम करण्यावर भर – अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील

0
6

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा घेतला आढावा, गणेशोत्सव व पूरस्थितीवर सज्जतेचे निर्देश

दि .२८ (पीसीबी) : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित संपर्क व जलद प्रतिसादासाठी अग्निशमन विभागाचा नियंत्रण कक्ष नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक सक्षम केला जात आहे. हे नवीन तंत्रज्ञान कसे वापरावे, याचे प्रशिक्षण नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना द्या. नागरिकांकडून आपत्तीबाबत मिळणाऱ्या माहितीचे व्यवस्थित संकलन केले जात आहे का, याची वेळोवेळी खात्री करा, असे निर्देश पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिले. आपत्ती काळात अग्निशमन विभागाचा सध्याचा प्रतिसाद वेळ आणखी कमी करून तो अधिक परिणामकारक कसा करता येईल, याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संत तुकाराम नगर येथील अग्निशमन विभागाच्या मुख्य कार्यालयाला भेट देऊन जांभळे पाटील यांनी येथील कामकाजाचा आढावा घेतला. या प्रसंगी सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, सहशहर अभियंता अनिल भालसाकळे, उपअग्निशमन अधिकारी ऋषीकांत चिपाडे, कार्यकारी अभियंता महेश कावळे व इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी नियंत्रण कक्षात जाऊन सिस्टिमची माहिती घेताना त्यांनी फोन प्रतिसादाची तत्परता तपासली. नियंत्रण कक्षाला फोन आल्यानंतर किती वेळात प्रतिसाद मिळतो, कोणती माहिती घेतली जाते, ती माहिती घेण्यासाठी किती वेळ लागतो, संबंधित माहिती अग्निशमन विभागाच्या पथकापर्यंत किती वेळात जाते, हे देखील त्यांनी तपासले. नियंत्रण कक्षातील सिस्टिम यूजर-फ्रेंडली असावी, याकडे लक्ष दिले आहे. ती योग्य पद्धतीने वापरण्याचे प्रशिक्षण या विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याला देण्यात यावे. आपत्तीचा प्रकार पाहून आपण त्या ठिकाणी कोणती पथके पाठवायची, याचे नियोजन केले आहे. त्यानुसार विभागानुसार पथकांना तात्काळ माहिती कशी जाईल, याकडे प्रामुख्याने लक्ष द्या. आपत्तीची माहिती देण्यासाठी एखाद्या नागरिकाने नियंत्रण कक्षात फोन केल्यानंतर त्याला आपत्ती ज्या भागात घडली आहे, तेथील लोकेशन कसे शेअर करता येऊ शकते, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने नियोजन करा, असेही ते म्हणाले.
असे चालते नियंत्रण कक्षाचे कामकाज

अग्निशमन नियंत्रण कक्षात आपत्कालीन फोन आल्यानंतर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. कॉल आल्यावर नियंत्रण कक्षातील स्क्रीनवर एक डिजिटल फॉर्म आपोआप उघडतो. या फॉर्ममध्ये संबंधित घटनेबाबतची प्राथमिक माहिती जसे की घटना घडलेले ठिकाण, आपत्तीचा प्रकार, किती लोक अडकल्याची शक्यता, तसेच कॉल करणाऱ्याचे नाव व संपर्क क्रमांक अशी माहिती भरली जाते. फॉर्म पूर्ण भरल्यानंतर संबंधित माहिती जवळच्या अग्निशमन केंद्राला तात्काळ पाठवली जाते, जेणेकरून बचाव पथक त्वरित घटनास्थळी रवाना होऊ शकेल. याशिवाय, प्रत्येक कॉलची नोंद प्रणालीत सुरक्षित ठेवली जाते.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सज्ज ठेवा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी, असे निर्देश देतानाच जांभळे पाटील म्हणाले, ‘‘गणेशोत्सव काळात शहरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते. मिरवणुका, मंडप, रोषणाई यामुळे अपघात किंवा आपत्कालीन घटना घडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अग्निशमन विभागाने सर्व उपकरणे कार्यरत स्थितीत ठेवावीत. मंडप उभारणीसाठी अग्निसुरक्षा नियमांचे पालन झाले आहे का, याची तपासणी करा. गर्दीच्या ठिकाणी अग्निशमन पथके सतत सतर्क ठेवा. नियंत्रण कक्षातील हेल्पलाइन नंबर अधिक नागरिकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ संपर्क साधता येईल. मिरवणुकीदरम्यान वाहतूक, वीज आणि इतर विभागांशी समन्वय ठेवून कार्यवाही करा. गणेशोत्सव काळात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास त्वरित प्रतिसाद देणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे.’’

पूरजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज

पिंपरी चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी, मुळा नद्या वाहत असून या नद्यांवरील धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरली आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात येतो. त्यामुळे नदीची पाणीपातळी वाढून शहरात पूरजन्य परिस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन अग्निशमन विभागातील ‘जलपरी’ या विशेष वाहनाचीही जांभळे पाटील यांनी पाहणी केली. यामधील बोटी, लाईफ जॅकेट, रोप, ओबीएम, बचाव साहित्य यांची कार्यक्षमता तपासण्यात आली. आपत्तीच्या वेळी त्वरित बचावकार्य सुरू करता यावे, यासाठी पथके आणि साहित्य सदैव तत्पर ठेवा, अशा सूचना त्यांनी दिल्या. नदीकाठावरील व पाणथळ भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आधीच नियोजन करावे. नियंत्रण कक्षाशी समन्वय ठेवून जलपरी वाहन व पथकांना आवश्यक तेथे तत्काळ रवाना करण्याची तयारी ठेवा. आपत्कालीन स्थितीत जीवितहानी होऊ नये, यासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.