दि. २३ (पीसीबी) : भाजप ही बोगस जनता पार्टी आहे, मत चोरी होणार नाही याची दक्षता घ्या, हे सगळं चालले आहे, प्रामाणिक निवडणूक घेतली तर हे महाराष्ट्र जिंकूच शकत नाही, जे जिंकले आहेत त्यांचे राहुल गांधी यांनी यांचे ढोंग उघडे पाडले असल्याचा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. राज्य शिक्षक सेनेच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, कबुतरांसाठी लोक रस्त्यावर उतरतात, कुत्रे आणि हत्तीसाठी उतरतात ही चांगली बाब आहे, पण पहलगामवेळी माणुसकी कुठं जाते? गरम सिंदूर वाहत असल्याचे बोलतात आणि देशाची टीम पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळणार, जय शाह तुमचा कोण लागून गेला? आता क्रिकेट आणि रक्त एकत्र वाहणार का? अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांनी पुढे सांगितले की, देशाच्या सैनिकांनी शौर्य गाजवून भाजप त्यांचे श्रेय घेत आहे. सोफिया कुरेशी या सैन्य अधिकाऱ्यांना आतंकवाद्यांची बहीण म्हणणारे भाजपचे गधडे आहेत. जगभरात आपलं शिष्टमंडळ गेलं, पण एकही देश आपल्या बाजूने उभा राहिला आहे का? आता पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळणार का? अशी विचारणा त्यांनी केली.
रशिया अफगाणिस्तानमध्ये घुसल्यावर ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे देश म्हणून ठाम आहात हे दाखवून द्या. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानबरोबर चीनही होता. पाकिस्तान चीनचा निषेध करायचा का? हे न शिकल्याचा परिणाम आहे. त्यांना चांगले शिक्षक मिळाले असते तर? यांना चांगला शिक्षक मिळाला नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. घुसखोरीवरूनही उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, बांगलादेशच्या शेख हसीनाला आम्ही आसरा दिलेला नाही. तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना आसरा देता आहात. या सर्वांची कीव येते पण कोणाची कीव येते हे कळत नसल्याचे ते म्हणाले.