पिंपरी, दि. 21 : बेसिक्स म्युनिसिपल वेस्ट व्हेंचर्स लिमिटेड तसेच डिव्हाईन मॅनेजमेंट अँड सर्व्हिसेस या कंपन्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून कचरा व्यवस्थापनाचे कंत्राट घेऊन कार्यरत आहेत. मात्र या कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांचे मागील काही महिन्यांपासून पगार वेळेवर दिले जात नाहीत.
कामगारांकडून आलेल्या तक्रारीनुसार, पगाराबाबत चौकशी केल्यास कंपनीकडून केवळ “फाईल प्रोसेसमध्ये आहे” असे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात पगार मिळण्याची कोणतीही ठोस तारीख अथवा लिखित माहिती दिली जात नाही. यामुळे कामगारांवर घरभाडे, ईएमआय, किराणा व दैनंदिन खर्च भागविण्यास मोठे संकट कोसळले आहे.
सणासुदीच्या काळात पगार न मिळाल्याने कामगारांच्या कुटुंबीयांना तीव्र आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या तक्रारी करताना अनेक कामगारांनी नाव गुप्त ठेवण्याची विनंती केली आहे, कारण पगाराबाबत आवाज उठवल्यास बदली, नोकरीवरून काढून टाकणे किंवा इतर सूडबुद्धीच्या कारवाया होऊ शकतात, अशी खरी भीती त्यांच्या मनात आहे.
या पार्श्वभूमीवर आज पिंपरी चिंचवड शहर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गटाचे वरिष्ठ उपाध्यक्ष, अॅड. धम्मराज साळवे यांनी महानगरपालिका आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन देऊन पुढील मागण्या केल्या आहेत :
- संबंधित कंपन्यांकडून प्रलंबित पगार तातडीने कामगारांना देण्यात यावा.
- भविष्यात पगारात कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये यासाठी महापालिकेने कठोर नियंत्रण ठेवावे.
- कामगारांचे हक्क अबाधित राहावेत यासाठी कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी. प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर सर्व कामगारांना सोबत घेऊन महापालिका गेटसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.