दि. १९ – दोन दिवसांपूर्वी निगडी येथे ऑप्टिकल फायबरच्या कामासाठी चेंबरमध्ये उतरलेल्या तीन कंत्राटी कामागारांचा दुर्देवी मृत्यू झाला. याबाबत नामदेव जाधव यांनी समाजमाध्यमावर व्हिडिओ प्रसारित करत पिंपरी चिंचवड महापालिकेची बदनामी केली असल्याचा आरोप महापालिका प्रशासनाने केला आहे. त्याबाबत कारवाई करण्यासाठी अधिकार्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी निगडी पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे.
त्यानुसार, निगडी प्राधिकरण हद्दीतील सेक्टर २७ ए, प्लॉट नं. ६५ समोर रस्त्याच्या कडेला बीएसएनएल इन्स्पेक्शन चेंबरमध्ये तीन कंत्राटी कामगार ऑप्टिकल फायबरच्या कामासाठी उतरले असता त्यामध्ये तीन कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाला. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचा कोणताही संबध नसताना तसेच कोणतीही माहिती न घेता नामदेव जाधव यांनी समाजमाध्यमांवर पिंपरी चिंचवड मनपावर आरोप करून व्हिडिओ व्हायरल केला. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेची नाहक बदनामी झाली. त्यामुळे जाधव यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी अधिकार्यांनी केली आहे.
ते चेंबर महापालिकेचे नव्हते. तसेच त्याच्यामध्ये महापालिकेचा काहीही संबंध नाही. मात्र, तरीही नामदेव जाधव यांनी कोणतीही माहिती न घेता महापालिकेची बदनामी केली. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी निगडी पोलिस ठाण्यात निवेदन दिले आहे, मुख्य अभियंतासंजय कुलकर्णी यांनी सांगितले आहे.