बेपर्वा व्यवस्थेचा थेट बळी

0
4

पुणे: एक निष्पाप जीव गेला. आई अजूनही मृत्यूशी झुंजतेय. आणि कारण? अपघात नव्हे, खूनच! हो, हा अपघात नव्हेच. हा एका निष्क्रिय यंत्रणेचा, भ्रष्ट सिस्टीमचा, आणि बेजबाबदार माणसांच्या बेपर्वा व्यवस्थेचा थेट बळी आहे. हिंजवडी फेज 2 मधील इन्फोसिस सर्कलजवळ 11 वर्षीय प्रत्युषा संतोष बोराटे हिचा सिमेंट मिक्सर ट्रकखाली चिरडून झालेला मृत्यू हा एक ‘अपघात’ म्हणणे म्हणजे अन्यायाला संरक्षण देणं ठरेल. कोण जबाबदार? 11 वर्षांच्या प्रत्युषाचा बळी आणि पुण्यातील ‘बेदरकार’ व्यवस्थेचा रक्तरंजित चेहरा! पुन्हा एकदा समोर आला आहे.

हिंजवडी परिसरात सकाळी 8 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 9 या वेळेत अवजड वाहनांना बंदी आहे. मग हे सिमेंट मिक्सर त्या वेळेत रस्त्यावर कसं काय फिरत होतं? कोणी परवानगी दिली? पोलिस कुठे होते? नियमांचं पालन होतंय की नाही हे पाहणं त्यांचं काम नाही का?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याऐवजी पोलिसांनी एव्हाना नेहमीच्या ‘पद्धती’नं अटक केली, केस घेतली आणि आता ‘तपास सुरू आहे’ अशा गोंजारणाऱ्या पोकळ गोष्टी सुरू झाल्यात. पण हा तपास किती काळ चालणार? अजून किती प्रत्युषा अशा ‘तपासांच्या’ काळ्या ढिगाऱ्याखाली गाडल्या जाणार?

पुण्यातील हॉटेल्स
प्रत्युषाचा बळी च सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसतं
सामोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं की, ट्रक थेट दुचाकीवर चढतो. दुचाकी रस्त्याच्या कडेला असताना देखील, ट्रक थांबत नाही. यात प्रत्युषाचा जागीच मृत्यू होतो, तिची आई गंभीर जखमी होते. हे काय अपघात आहे? की ठरवून केलेली अमानुष बेपर्वाई? या ट्रकचालकाला फक्त ‘अवैध वेळेत वाहन चालवणे’ आणि ‘दुचाकीला धडक’ या कलमांखाली शिक्षा होणार का? का त्याच्यावर हत्या सदृश्य गुन्हा दाखल केला जाणार?

प्रशासन, पोलीस आणि ट्रक मालकही जबाबदार!
एक चालक पकडला. पण ट्रकचा मालक कोण? त्याने त्या वेळेत ट्रक चालवायला परवानगी दिलीच कशी? या ट्रकचं मॉनिटरिंग कोण करतं? कोणत्या कंपनीचा कंत्राट? पोलीस, RTO यांनी हे वाहन थांबवलं का नाही? ही जबाबदारी आता फक्त त्या 25 वर्षांच्या चालकावर ढकलणं म्हणजे मुख्य गुन्हेगारांना मोकाट सोडणं होईल. हिंजवडी पोलिसांचं अपयश?, प्रशासनाची बेफिकिरी? , वाहतूक विभागाची गप्पी भूमिका? कंत्राटदारांची लालसेने चालवलेली गुन्हेगारी? या सगळ्यांचं उत्तर एक 11 वर्षांची मुलगी देऊन गेली. तिचं नाव – प्रत्युषा. आता तिच्या नावाने या सिस्टीमला जागं करण्याची आवश्यकता आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे महानगरपालिकेपासून वाहतूक पोलीस, RTO, आणि स्थानिक राजकारणी – प्रत्येकाला विचारलं पाहिजे की, तुम्ही अजून किती निष्पाप बळी घेतल्यावर जागे होणार, असा सवाल जनता करत आहे.