मुंबईत आज सरकारी-खासगी कार्यालयांना सुट्टी; मुसळधार पावसाचा रेड अलर्ट

0
5

मुंबई, दि. १९ : मुंबई महानगरपालिकेकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून, महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेने यासोबतच खाजगी कार्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र अत्यावश्यक कारणास्तव काम सुरु ठेवायचे असल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, संबंधित कार्यालयांनी महापालिकेच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय हवामान खात्याने आज, मंगळवार (19 ऑगस्ट 2025) रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी (मुंबई शहर व उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. शहरात सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून, ठिकठिकाणी पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) तर्फे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणून जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार, मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच महापालिका कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.

खासगी कार्यालये व आस्थापनांनाही आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनावश्यक प्रवास टाळावा, सुरक्षिततेसाठी घरात राहावे, असे आवाहन बीएमसीकडून करण्यात आले आहे.

हवामान खात्याने मुंबईला कालच रेड अलर्ट दिला होता. त्यानुसार येत्या काही तासांमध्ये मुंबईत अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे. सध्या मुंबईतील आकाशात काळ्या ढगांची गर्दी असल्याने अंधारून आले आहे. रात्रीप्रमाणे सर्वत्र अंधार आहे. पहाटेपासून सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे. रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यात जमा आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून सरकारी आणि खासगी कार्यालयांन सुट्टी जाहीर केली आहे.

मुंबईत रेल्वे ट्रॅ्कवर पाणी भरलं, मध्य रेल्वेच्या गाड्या 40 मिनिटं उशीरा

पावसाचा फटका मुंबईतील लोकल ट्रेनच्या वाहतुकीला बसताना दिसत आहेत. मध्य रेल्वेमार्गावरील घाटकोपर ते दादर परिसरात रेल्वे रुळांवर मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. तर माटुंगा रेल्वे स्थानकातील रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. सध्या मध्य रेल्वेमार्गावरील गाड्या तब्बल 25 ते 30 मिनिटं उशिराने धावत आहेत. हार्बर रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेनही अर्धा तास उशीरा धावत आहेत. तर एरवी सहसा फारसा परिणाम न होणार्‍या पश्चिम रेल्वेमार्गाच्या वाहतुकीलाही पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेन 15 मिनिटं उशिराने धावत आहेत.