पावसामुळे उद्भवणारी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे – आयुक्त शेखर सिंह

0
5

नदीकाठ परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे केले आवाहन

पिंपरी, दि. १९ पिंपरी चिंचवड शहर परिसरात तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाकडून पुणे जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट देण्यात आला असून पुणे जिल्हा व घाट परिसरात पुढील तीन तासात ४० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या नद्यांवरील धरणामधून करण्यात येणाऱ्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठ परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. पावसामुळे उद्भवणारी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याचे निर्देश देखील आयुक्त सिंह यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून यामध्ये धरणातून विसर्ग देखील केला जात आहे. विशेषत: पवना धरण जवळपास ९७ टक्के भरले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असून धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जात आहे. आज सकाळी ९ वाजता सुमारे ५ हजार ६६० क्युसेक इतका विसर्ग या धरणातून पवना नदीपात्रात करण्यात आला. पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणाऱ्या विसर्गाचे प्रमाण अवलंबुन असल्याचे पवना धरण पूर नियंत्रण कक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे. यासर्व बाबी विचारात घेता महापालिकेच्या सर्व यंत्रणांनी दक्ष राहण्याचे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले.

नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे लागल्यास त्याठिकाणी भोजन, वैद्यकीयसह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाने तात्काळ कार्यवाही करावी, क्षेत्रीय कार्यालयांमार्फत जलद प्रतिसाद पथकाने दिवसरात्र नदीकाठ परिसरावर लक्ष ठेवावे, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांशी समन्वय साधून त्याभागातील आपत्कालीन परिस्थिती हाताळावी, असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक साधनसामुग्रीसह आपत्कालीन पथकाने सज्ज राहावे, सखल भागात नदीच्या पाणी पातळीची माहिती देण्यासाठी ध्वनीक्षेपकाद्वारे त्याभागात वारंवार सूचना देण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले. पावसामुळे साथीच्या आजारांचा प्रसार होऊ नये यासाठी धुरीकरण, औषध फवारणी, तसेच नागरिकांची आरोग्य तपासणी यावर भर देण्यात यावा, वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून कार्यवाही करावी, अशा सूचना देखील आयुक्त सिंह यांनी दिल्या.

महापालिकेचे आयुक्त शेखर सिंहन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी परिस्थितीचा नियमित आढावा घेत असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी कोणतीही आपत्कालीन मदत हवी असल्यास महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्ष क्रमांक ०२०-६७३३११११ / ०२०-२८३३११११ किंवा अग्निशमन विभागाच्या ७०३०९०८९९१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.
……
जलद प्रतिसाद पथके तैनात

ज्याभागात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण होते, अशा परिसरात विशेष लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने जलद प्रतिसाद पथके तैनात केली आहेत. क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली नेमलेल्या या पथकामध्ये स्थापत्य, आरोग्य, पाणी पुरवठा, पर्यावरण, अग्निशमन, सुरक्षा, शिक्षण, वैद्यकीय अशा विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
……..
अग्निशमन विभागाचे महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक:

पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र – ९९२२५०१४७५

भोसरी अग्निशमन केंद्र – ९९२२५०१४७६

प्राधिकरण अग्निशमन केंद्र – ९९२२५०१४७७

चिखली अग्निशमन केंद्र – ८६६९६९४१०१

थेरगाव अग्निशमन केंद्र – ७०३०९०७९९९

रहाटणी अग्निशमन केंद्र – ९९२२५०१४७८

मोशी अग्निशमन केंद्र – ७२६४९४३३३३

तळवडे अग्निशमन केंद्र – ९५५२५२३१०१
खडकवासला व मुळशी धरणातून विसर्ग सुरू

मुळशी धरण ९५ टक्के भरले असून या धरणातून आज दुपारी १२ वाजल्यापासून मुळा नदी पात्रात ५ हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती टाटा पॉवर मुळशी धरण यांनी दिली आहे. तर, खडकवासला धऱणाच्या सांडव्यातून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा ७ हजार ५६१ क्युसेक विसर्ग वाढवून दुपारी १२ वाजता ९ हजार ६५९ क्युसेक करण्यात येणार आहे. यामध्ये आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. तसेच पावसाच्या प्रमाणानुसा व येव्यानुसार विसर्ग कमी जास्त होण्याची शक्यता असल्याचे मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग स्वारगेट, पुणे यांच्यावतीने कळविण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या सर्व रहिवाश्यांनी सावधगिरी बाळगावी, नदीपात्रात कोणीही उतरू नये तसेच शेती अवजारे, पंप किंवा जनावरे तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत, असे आवाहन शासनाच्या पूर नियंत्रण कक्षाने केले आहे.