पिंपरी, दि. १९ ‘आपल्या देशातील कुंभमेळ्यासहित विविध धार्मिक यात्रा आणि वारीसारखे सोहळे यामुळे हिंदुधर्म सुरक्षित राहिला आहे!’ असे विचार विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सहसेवा प्रमुख आनंद हरबोला यांनी भारतमाता भवन, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवड येथे सोमवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी व्यक्त केले. विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत सेवा विभाग आयोजित कृतज्ञता सोहळ्यात आषाढी वारीत आरोग्यसेवा देणाऱ्या संस्था, डॉक्टर्स, परिचारिका, वैद्यकीय साहाय्यक आणि स्वयंसेवक यांना सन्मानित करताना आनंद हरबोला बोलत होते. विश्व हिंदू परिषद मुंबई क्षेत्र मंत्री रामचंद्र रामुका कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे, प्रांत सहमंत्री नितीन वाटकर, प्रांत सेवा प्रमुख ॲड. श्याम घरोटे, बाळासाहेब वाघ, यशवंत देशपांडे, पुणे विभाग सेवा प्रमुख विजय देशपांडे, माजी नगरसेवक सुरेश भोईर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
आनंद हरबोला पुढे म्हणाले की, ‘साडेसातशे वर्षांची गुलामगिरी सोसूनही धार्मिक यात्रा आणि वारीमुळे निर्माण होणारी धर्मचेतना आणि राष्ट्रभाव जागृत राहिला. जातपात, भेदभाव नष्ट करीत अन् लोकसंस्कृती, लोकपरंपरा समृद्ध करून संपूर्ण समाजाला समरस करण्याचे सामर्थ्य वारीत आहे. वारीमध्ये निरंकारी होत सामील झाल्यावर मनात सेवाभाव जागृत होतो. धर्मरक्षणासाठी आपल्या अस्थींचे दान करणार्या महर्षी दधिची ऋषींचा वारसा आपल्याला लाभला आहे!’ रामचंद्र रामुका यांनी, ‘नि:स्वार्थ भावनेतून केलेली सेवा ही सर्वश्रेष्ठ असते, असे भगवान श्रीकृष्ण यांनी म्हटले आहे. समाजातील सर्वांच्या सहभागातून गोवर्धन पर्वत उचलून धरला होता. तसेच विश्व हिंदू परिषदेच्या सेवाकार्याला समाजाच्या सर्व स्तरातून सहयोग मिळतो!’ अशी भावना व्यक्त केली. किशोर चव्हाण यांनी, ”धर्म रक्षति रक्षित:’ हे ब्रीद घेऊन विश्व हिंदू परिषद कार्यरत असून सुमारे अडतीस वर्षांपासून वारीत आरोग्यसेवा दिली जाते!’ अशी माहिती दिली.
अखंड भारतमाता आणि श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्रिवार ओंकार तसेच एकात्म मंत्रपठण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. डॉ. शर्वरी यरगट्टीकर यांनी प्रास्ताविकातून, आरोग्यवारीत सोळा डाॅक्टर्स, आठ परिचारिका, दोन मदतनीस, सोळा स्वयंसेवक, सतरा देणगीदार आणि सोळा रुग्णवाहिका यांनी योगदान दिले. त्यामुळे सुमारे साडेपाच लाख वारकरी सेवेचे लाभार्थी झाले, अशी माहिती दिली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आरोग्यसेवा देणाऱ्या व्यक्तींना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सन्मानार्थींनी उत्स्फूर्तपणे मनोगते व्यक्त करीत अनुभवकथन केले.
जिल्हा मंत्री धनंजय गावडे, संभाजी बालघरे, प्रज्ञा फुलपगार यांनी संयोजनात सहकार्य केले. नवनाथ साकोरे यांनी सूत्रसंचालन केले. विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष ॲड. ललित झुनझुनवाला यांनी आभार मानले. सामुदायिक शांतिमंत्राने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.