डीबीटी मार्फत शालेय साहित्यांचे वाटप पूर्ण!

0
4

महापालिकेच्या शाळांमधील ५७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मिळाला थेट व पारदर्शक लाभ

पिंपरी, दि. १८ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य वेळेत, थेट आणि पारदर्शक पद्धतीने मिळावे, यासाठी महापालिकेने राबवलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer – DBT) या अभिनव उपक्रमाद्वारे शालेय साहित्याचे वाटप पूर्ण झाले आहे. या योजनेतून महापालिकेच्या शाळांमधील ५७ हजार ५६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट यशस्वीरित्या वितरित करण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ४२ हजार ७७० तर तिसऱ्या टप्प्यात १४ हजार ७९० विद्यार्थ्यांना डीबीटी अंतर्गत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

महापालिकेच्या शिक्षण विभागाने बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने डिजिटल ई-रूपी पेमेंट प्रक्रिया राबविल्यामुळे साहित्य वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येऊन सदर प्रक्रिया जलदपणे पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेत निधी थेट लाभार्थी विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोहोचला. या प्रक्रियेमुळे मध्यस्थ किंवा कागदी प्रक्रियेमधील विलंब टाळला गेला आणि प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्याचे किट लवकर मिळण्यास मदत झाली आहे.

डीबीटी हा विश्वासार्हतेचा नवा मापदंड ठरला आहे. महापालिकेच्या शाळांमधील प्रत्येक विद्यार्थी समानतेने लाभ घेत आहे, हीच या उपक्रमाची खरी ताकद आहे. वेळेत आणि दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देणे, हे आपल्या शिक्षण व्यवस्थेला भक्कम आधार देणारे पाऊल ठरले आहे.

• शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

ई-रूपी पेमेंट प्रक्रियेमुळे वितरण कार्य केवळ वेगवानच झाले नाही, तर पालकांमध्येही विश्वास वाढला आहे. लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी थेट पोहोचल्यामुळे महापालिकेच्या सेवांबाबत पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासनाची प्रतिमा अधिक बळकट झाली आहे.

• प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

डीबीटी योजनेमुळे मुलांना वेळेत शालेय साहित्य मिळाले, त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अडथळ्याविना झाली. बालवाडीतल्या चिमुकल्यांपासून ते माध्यमिक विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना दिलेले दर्जेदार साहित्य हे त्यांच्या आत्मविश्वासात भर घालणारे ठरले आहे.

• किरणकुमार मोरे, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका