तीन मजुरांच्या मृत्यू प्रकरणी कष्टकरी कामगार पंचायतचा पाठपुरावा

0
3

पिंपरी, दि. 18 निगडी परिसरात 15 ऑगस्ट 2025 रोजी, स्वातंत्र्यदिनी, एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. बीएसएनएलच्या ऑप्टिकल फायबर लाईन दुरुस्तीचे काम करत असताना तीन मजुरांचा डकमध्ये गुदमरून मृत्यू झाला. या गंभीर दुर्घटनेनंतरही बीएसएनएलच्या संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली असून, या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. यामुळे कष्टकरी कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कायदेशीर कारवाईची मागणी:
या प्रकरणाची गंभीर दखल घेत कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. आज सकाळी त्यांनी निगडी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन दुर्घटनेची सखोल माहिती घेतली. यावेळी पोलिसांनी बीएसएनएल अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर डॉ. बाबा कांबळे यांनी आकुर्डी येथील बीएसएनएल कार्यालयाची पाहणी केली, परंतु तिथे कोणतेही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते. यानंतर त्यांनी चिंचवड येथील बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि या प्रकरणी तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

कष्टकरी कामगार पंचायतच्या प्रमुख मागण्या:

  • या दुर्दैवी दुर्घटनेस जबाबदार असलेल्या संबंधित ठेकेदार आणि बीएसएनएल अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
  • मृत्यू झालेल्या प्रत्येक मजुराच्या कुटुंबीयांना 30 लाख रुपये इतकी नुकसानभरपाई आर्थिक मदत म्हणून तात्काळ देण्यात यावी.
  • मृत मजुरांच्या कुटुंबातील प्रत्येकी एका पात्र व्यक्तीला नोकरीवर सामावून घेण्यात यावे.

पोलीस आयुक्तांकडून कारवाईचे आश्वासन:
डॉ. बाबा कांबळे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पोलीस आयुक्तांनी तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यानंतर दुपारी 4 वाजता बीएसएनएलचे सर्व संबंधित अधिकारी निगडी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे.

बीएसएनएलचा गलथानपणा आणि बेजबाबदारपणा:
तीन मजुरांच्या मृत्यूच्या या गंभीर घटनेनंतरही बीएसएनएलकडून होत असलेली ‘बनवाबनवी’ आणि टाळाटाळ अत्यंत संतापजनक आहे. “हे आमचे कामगार नाहीत, आम्ही त्यांना हे काम सांगितले नाही,” अशा प्रकारची खोटी माहिती देऊन बीएसएनएलचे अधिकारी जबाबदारीपासून हात झटकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांनीही “हे कामगार आमचे नव्हते” असे जाहीर करून त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. हे कृत्य सरकारी संस्था आणि अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा दर्शवते.

डॉ. बाबा कांबळे यांनी दिवसभर पाठपुरावा केल्यानंतर सांगितले की, “हे कामगार कोणातरी बीएसएनएलच्या अधिकाऱ्याच्या अंतर्गत काम करत होते हे सत्य आहे आणि यात निष्काळजीपणा झालेला आहे. परंतु आपली बाजू सावरण्यासाठी बीएसएनएलकडून खोटे दावे केले जात आहेत आणि या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे.”

सरकारी संस्था आणि अधिकारी अशाप्रकारे बनवाबनवीचे कामव करत असतील, तर कामगारांनी न्यायासाठी कुणाकडे जायचे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, या मृत कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पूर्ण न्याय मिळेपर्यंत कष्टकरी कामगार पंचायत या प्रकरणाचा पाठपुरावा करतच राहील. ही घटना बीएसएनएलच्या गलथान कारभाराचे द्योतक असून, कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

नागरिकांना आवाहन:
कष्टकरी कामगार पंचायत सर्व नागरिकांना आणि कामगार हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांना या गंभीर प्रकरणात पाठिंबा देण्याचे आणि मृत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवण्याचे आवाहन करते. कामगारांच्या हक्कांसाठी एकजुटीने उभे राहण्याची हीच वेळ आहे.