पुणे, दि. १७ – म्हाडाच्या अनागोंदी कारभारामुळे “कोणी नवीन घर देत का घर” अशी लोकमान्यनगरवासीयांची अवस्था झाली आहे. पुणे लोकमान्यनगर बचाव कृती समितीच्या वतीने लोकमान्यनगर येथील रहिवासी एकत्र येवून लोकमान्यनगर बचावासाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी लोकमान्यनगर येथील सर्व कुटुंबासहित शेकडो रहिवाशांनी उपस्थित होते. गेली अनेक वर्षं चर्चेत असलेला लोकमान्यनगर पुनर्विकास सुरळीतपणे होऊ लागलेला असतानाच पुनर्विकास प्रक्रियेला स्थानिक आमदाराने हस्तक्षेप करून तात्पुरती स्थगिती मिळविल्याने त्यामुळे लोकमान्य नगरमधील ८०३ घरात राहणाऱ्या लोकांचा स्वप्नभंग झाला. सदरील लोक शेकडोच्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. यावेळी स्थानिक लोकांनी म्हाडाच्या, शासनाच्या आणि आमदाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
सध्या या ठिकाणी अनियमित पाणीपुरवठा, मोडकळीस आलेलं बांधकाम, ड्रेंनेजची झालेली दुरवस्था अशा अनेक अडचणींचा सामना दैनंदिन जीवनात करावा लागत आहे. त्यात पुन्हा पुनर्विकासाला स्थगिती मिळाल्याने “घरचं झालं थोडं व्याही यांनी धाडलं घोडं” अशी अवस्था लोकमान्यनगरची झाली आहे. लोकमान्यनगर बचाव कृती समितीच्या वतीने म्हाडाचे संबंधित अधिकारी, मुख्यमंत्री कार्यालय यांच्याशी संपर्क साधत आहे.
लोकमान्यनगर येथे काही सोसायट्यांनी स्वतःचा विकासक नेमला, इमारती तयार झाल्या लवकरच रहिवासी रहावयास जाणार आहेत. यामध्ये मित्तल बिल्डर्सचे डॉ. नरेश मित्तल यांनी ४२, ४३, ४४, ४५ सदरील चारही मिळून सोसायटी झाली म्हाडाने करोडो रुपये घेवून परवानगी दिली. तरी देखील स्थगिती दिली आहे. त्याच बरोबर देशपांडे बिल्डर्स हे इमारत क्रमांक ३६, ३७, ३९ तसेच मानव बिल्डर्स इमारत क्रमांक ३४, ३५ जोगळे बिल्डर्स इमारत क्रमांक ११, ११ अ, १२ गौतम ढवळे आयकॉन डेव्हपर्स यांच्याकडे इमारत क्रमांक १,२,३,४ म्हाडाकडे परवानगीसाठी कायदेशीर कागदपत्रे देवून देखील म्हाडाने कामाला खीळ बसवली आहे. इमारत क्रमांक १५ व ५३ श्रीकांत उणेचा बिल्डर्स यांच्या म्हाडाकडे परवानगीसाठी अंतिम टप्प्यात आहे. तसेच इतर सोसायट्या देखील विविध बिल्डर बरोबर पुनर्विकासाठी चर्चा व प्रयत्नशील आहेत.
लोकमान्यनगर येथे सन १९६० ते १९६४ या चार वर्षात ५३ इमारती उभ्या राहिल्या आहेत. सध्या याठिकाणी ८०३ फ्लॅट धारक आहेत. त्याकाळात या सर्व इमारती लोड बेरिंगच्या करण्यात आल्या होत्या. सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झाल्या आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी सिमेंट प्लास्टर पडले असून भिंतींमध्ये झाडे उगवली आहेत. स्लॅब पडले असून काही स्लॅब गळत आहेत. तर भिंतीना चिरा पडल्या आहेत. काही इमारती तिरक्या झाल्या आहेत. अशा नरक यातना सोसत येथील रहिवाशी जीव मुठीत घेवून राहत आहेत. येथील सर्व इमारती कॉपरेटिव सोसायटी रजिस्टर झाल्या आहेत. त्यांचे प्रॉपर्टी कार्ड व नोंदणी झाली आहे. सेल डीड, लीस डीड, कन्व्हेन्स डिड झाले असून देखील म्हाडाच्या भोंगळ कारभारामुळे येथील नागरिक हवालदिल झाले आहेत.
शासनाकडून त्वरित दखल जो पर्यंत घेतली जात नाही. तो पर्यंत हा लढा चालूच राहणार असून हा लढा भविष्यात तीव्र होणार असल्याचे पुणे लोकमान्यनगर बचाव कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी लोकमान्यनगर येथील अनेक रहिवाशी कुटुंबासहित मोठ्या संख्येने उपस्थित होते.