भक्ती शक्ती येथे देशभक्तीचा जल्लोष!!

0
32

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘झेंडा उंचा रहे हमारा’ कार्यक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद…

पिंपरी, दिं. १६ (पीसीबी) – आकाशामध्ये डौलाने फडकणारा तिरंगा आणि दुसरीकडे ‘ऐ वतन, वतन मेरे आज़ाद रहे तू’, ‘दिल दिया है, जान भी देंगे ये वतन तेरे लिये’, ‘आय लव्ह माय इंडिया’, ‘जय जय महाराष्ट्र माझा’, ‘वंदे मातरम्’ यांसारख्या हृदयाला भिडणाऱ्या देशभक्तिपर गाण्यांचे सादरीकरण… असा देशप्रेम, शौर्य आणि ऐक्याचा अद्वितीय संगम पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त निगडी येथील भक्ती शक्ती येथे आयोजित केलेल्या ‘झेंडा उंचा रहे हमारा’ या कार्यक्रमात पाहायला मिळाला.

भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा ७८ वा वर्धापन दिन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर महापालिकेच्या वतीने निगडी येथील भक्ती शक्ती चौकात आयोजित देशभक्तिपर गीतांच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे यांनी याप्रसंगी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास आणि त्यातून मिळालेल्या स्वातंत्र्याचे महत्त्व सांगितले. तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘घरोघरी तिरंगा – घरोघरी स्वच्छता’ या मोहिमेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली

देशभक्तिपर गीतांच्या कार्यक्रम अनुभवण्यासाठी महापालिकेचे मुख्य उद्यान अधिक्षक महेश गारगोटे,मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे,मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल,विशेष अधिकारी किरण गायकवाड,कार्यकारी अभियंता संतोष दुर्गे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशभक्तिपर गीतांच्या सादरीकरणासोबतच ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘हम सब एक हैं’ अशा घोषणांचा आवाज येथे दुमदुमत होता. उत्साह, अभिमान आणि राष्ट्रभक्तीची भावना प्रत्येकाच्या मनात जागवणारे असे वातावरण येथे होते.

या कार्यक्रमात ‘ए वतन, वतन मेरे आज़ाद रहे तू’, ‘दिल दिया है जान भी देंगे’, ‘तेरी मिट्टी में मिल जावां’, ‘एक तू ही भरोसा’, ‘देश रंगीला’, ‘जय जय महाराष्ट्र माझा’, ‘कर हर मैदान फतेह’, ‘संदेसे आते हैं’, ‘मेरा रंग दे बसंती चोला’, ‘वंदे मातरम’ यांसारखी अनेक लोकप्रिय गाणी हिंदी व मराठी भाषेतील देशभक्तीपर गीते एकत्र येऊन देशप्रेमाचे सुंदर वातावरण तयार झाले होते.

या कार्यक्रमाचे नियोजन महापालिकेचे सहशहर अभियंता मनोज सेठीया यांनी केले होते. तर गायक सतीश इंगळे,अमित दीक्षित, दीपक माने, आशिष देशमुख, किरण अंदुरे, पृथ्वीराज अंदुरे, गायिका मनीषा निश्चल दृष्टी बालानी, प्रीती बिजवे यांनी देशभक्तीची गाणी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. स्वराज मुझिक स्वराज म्युझिक बँडच्या ९ प्रतिभावान वादकांनी त्यांना उत्तम साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महापालिकेचे उपअभियंता किरण अंधुरे यांनी केले.