दि.१२ (पीसीबी) – पिकअप गाडीच्या चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे झालेल्या अपघातात दहा महिलांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (११ ऑगस्ट) दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास पापळवाडी ते कुंडेश्वर महादेव मंदिर डोंगराच्या पायथ्यालगत घडली. याप्रकरणी पिकअप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिकअप चालक ऋषिकेश रामदास करंडे (२५, पापळवाडी, पाईट, ता. खेड) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सिध्दीका रामदास चोरघे (२१, पापळवाडी, पाईट, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शारदा रामदास चोरघे (४०), शोभा ज्ञानेश्वर पापळ (४५), सुमन काळुराम पापळ (४७), मंदा कानिफ दरेकर (५५), संजिवनी उर्फ संजाबाई कैलास दरेकर (५०), मिराबाई संभाजी चोरघे (५०), बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर (६५), शकुंतला उर्फ सखुबाई तानाजी चोरघे (५५), पार्वताबाई दत्तु पापळ (५५) आणि फसाबाई प्रभु सावंत (५५) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऋषिकेश करंडे याच्याकडे माल वाहतुकीचा परवाना असतानाही त्याने पिकअप गाडीत महिला आणि लहान मुलांना दाटीवाटीने बसवले होते. तो गाडी घेऊन पापळवाडीहून श्री क्षेत्र कुंडेश्वर महादेव मंदिराकडे जात असताना, तीव्र चढ आणि वळणांच्या घाटात डोंगराच्या पायथ्याशी गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी मागे घसरून रस्त्याच्या कडेला असलेल्या २५ ते ३० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात १० महिलांचा मृत्यू झाला असून, इतर महिला व मुले गंभीर आणि किरकोळ जखमी झाले आहेत. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.