पन्हाळा तालुक्यातील प्राथमिक शाळेची भिंत कोसळली ! जिल्ह्यातील १०० शाळांच्या धोकादायक इमारतींचे सर्व्हे !!

0
5

महाराष्ट्र , दि. ८ (पीसीबी) : पन्हाळा तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या इमारतीची भिंत कोसळली. इयत्ता पहिली-दुसरीच्या वर्गाची भिंत गुरुवारी (७ ऑगस्ट २०२५) दुपारी कोसळली. शाळेच्या मधल्या सुट्टीच्या कालावधीत ही घटना घडली. यावेळी विद्यार्थी जेवणासाठी वर्गाबाहेर होते. सुदैवाने या घटनेत जिवीतहानी झाली नाही. दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना सूचना केल्या आहेत की, धोकादायक इमारत व वर्ग खोल्यामध्ये विद्यार्थ्यांना बसवू नये. शिवाय जिल्ह्यातील शाळांचा सर्व्हे करण्यात आला आहे.यामध्ये शंभर शाळांच्या धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात येणार आहे.

या शाळेची इमारत शंभर वर्षापूर्वीची आहे. या ठिकाणी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग भरतात. जवळपास ११० पटसंख्या आहे. इयत्ता पहिली व दुसरीचे वर्ग एकाच खोलीत भरतात. या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २५ आहे. गुरुवारी दुपारी मधली सुट्टी होती. जेवणासाठी मुले वर्गाबाहेर होती. शालेय पोषण आहार अंतर्गत आहार घेत असतानाच इयत्त्ता पहिली-दुसरीच्या वर्गाची भिंत कोसळली. शाळेची भिंत कोसळल्याचे समजताच पन्हाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी शाळेला भेट दिली. शाळेची पाहणी केली. तसेच डागडुजी करण्याच्या सूचना दिल्या.

“ सातवे विद्यामंदिराची इमारत शंभर वर्षापूर्वीची आहे. शाळेच्या इमारतीची भिंत जीर्ण झाल्यामुळे कोसळली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. मुख्यमंत्री प्रशासकीय गतीमानता अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेच्या धोकादायक इमारतींचा सर्व्हे करुन स्ट्रक्चरल ऑडिटचे काम सुरू आहे. त्या अंतर्गत ११३ शाळांची यादी प्राप्त झाली आहे. विशेष लक्ष देऊन निर्लेखनाचे कामकाज एका महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे.या व्यतिरिक्त् अन्य काही शाळा इमारतीचे निर्लेखन व तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्यास प्रस्ताव पाठविण्याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. तसेच सर्व पर्यवेक्षक व मुख्याध्यापकांना सूचना केल्या आहेत, कोणत्याही परिस्थितीमध्ये धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करू नये.”