सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकींमधील पहिला टप्पा हा जिल्हा परिषदांचा असणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये नगरपालिका तसेच नगरपरिषदांच्या निवडणुका होतील. तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात मुंबईसह इतर सर्व महापालिकांच्या निवडणुका होतील, असं सांगण्यात आलं आहे.
डिसेंबर 2025 अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. असं असेल तर दिवाळीनंतर आचारसंहिता लागू होवून राज्यात निवडणुकीचा धुरळा उडणार असं सांगितलं जात आहे.
याच वर्षी 6 मे रोजी सुप्रीम कोर्टाने पुढील चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. मात्र पावसाळा आणि सणासुदीमुळे निवडणुका दिवाळीनंतर घेत असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात सादर करणार असल्याची माहिती मिळत आहे.
राज्य शासनाचं नियोजन कसं?
मुंबई, ठाणे, पुणे महानगरपालिकांसाठी 4 सप्टेंबर, तर 19 महानगरपालिका आणि 250 पेक्षा अधिक नगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना 1 सप्टेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचे वेळापत्रक राज्य शासनाने तयार केले आहे. सर्व महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना या वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे वेळापत्रक नगरविकास विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.
मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, इचलकरंजीसह 29 महानगरपालिका तसेच नगर परिषद व पंचयात समित्यांच्या प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्याचे आदेश महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
2011 ची लोकसंख्याच धरणार
2011 च्या जनगणनेनुसार एससी, एसटी लोकसंख्या उपलब्ध असून त्यानुसार आरक्षण ठरविले जाईल. मनुष्यबळ, मतदार याद्यांसाठी अद्याप परवानगी मिळालेली नाही. प्रभाग, वॉर्ड, गटरचना प्रक्रिया सुरू आहे.