भरदिवसा तरुणावर गोळीबार; पिंपरी कॅम्प परिसरात खळबळ

0
16

पिंपरी दि . १ ( पीसीबी )  : पिंपरी कॅम्प येथे भरदिवसा एका दुचाकीस्वाराने दुकानाबाहेर बसलेल्या तरुणाच्या पायावर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत.

भावेश काकरानी, असे जखमी तरुणाचे नाव आहे. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गळ्यातील चेन खेचून पळ काढण्याच्या प्रयत्नात झालेल्या प्रतिकारामुळे चोरट्याने हा गोळीबार केला आहे. यामध्ये भावेश जखमी झाला आहे. प्रत्यक्षदर्शी यांच्याकडून असे सांगितले जात असले तरी, पोलिसांना यामध्ये वेगळाच संशय असून विविध अंगांनी तपास सुरू करण्यात आला आहे. 

घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा

घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस ठाण्याचे अधिकारी, गुन्हे शाखेचे पथक आणि फॉरेन्सिक युनिट घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपीच्या शोध सुरू आहे. पोलिसांनी भावेशकडून सविस्तर माहिती घेतली असून त्याचे मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड्स यांचाही आढावा घेतला जात आहे.