पिंपरी दि . १ ( पीसीबी ) : पिंपरी चिंचवड शहरातील विविध समस्या आणि त्यावर सुसंगत उपाययोजनांसाठी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले. या निवेदनात दोन प्रमुख मुद्द्यांचा समावेश होता, ज्यामध्ये पवना नदी सुधार प्रकल्पास गती देणे आणि पिंपरी मिलेट्री डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे यांचा समावेश होता.
पवना नदी सुधार प्रकल्पाच्या कामांना गती देण्याबाबत नगरसेवक संदीप वाघेरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनात म्हटले की, पिंपरी चिंचवड शहराच्या स्वच्छतेसाठी आणि पर्यावरण संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण (SEIAA) कडून अधिकृत पर्यावरण मंजुरी (Environment Clearance) व ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. हा ऐतिहासिक निर्णय नुकताच घेण्यात आला. सादर करण्यात आलेल्या सविस्तर अहवालात प्रकल्पाच्या प्रत्येक पैलूची शास्त्रीय व तांत्रिक पातळीवर बारकाईने तपासणी करण्यात आली आणि अखेरीस प्रकल्पास मंजुरी देण्यात आली.पवना नदी सुधार प्रकल्पाची अंमलबजावणी करणेकामी अंदाजे १४३४ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता महानगरपालिकेस लागणार आहे.
पिंपरी चिंचवड शहराला पावसाळ्यात पवना नदीच्या पुराचा फटका मोठ्या प्रमाणावर बसत असल्याने चिपळूण व महाड शहराच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड शहरास आपत्कालीन निधीतून ५८० कोटी रुपये देण्याची विनंती महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे तसेच केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नदी संरक्षण संचलनालय (NRCD) अथवा जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजेन्सी (जायका) यांचेमार्फत निधी उपलब्ध झाल्यास या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील पर्यावरण सुधारता येईल आणि नदीच्या काठावरील रहिवाशांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित परिसर निर्माण होईल
तसेच, पिंपरी मिलेट्री डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या प्रलंबित कामाबाबत त्यांनी निवेदनात म्हटले की, या पुलाच्या अभावामुळे स्थानिक वाहतूक आणि नागरिकांची दैनंदिन जीवनशैली प्रभावित होत आहे. सद्यस्थितीला सदर उड्डाणपुलाचे रेल्वे हद्दीबाहेरील काम बहुतांशी पूर्ण झाले असून उर्वरित काम हे रेल्वे विभागाची परवानगी नसले कारणाने प्रलंबित आहे. महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाच्या वतीने रेल्वे हद्दीतील उड्डाणपुलाच्या कामास परवानगी मिळणे संदर्भात प्रस्ताव मुख्य अभियंता,मध्य रेल्वे,मुंबई यांचेकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आलेला असून त्यांचे मार्फत पुढील कार्यवाहीची परवानगी मिळणे आवश्यक आहे यामुळे रेल्वे उड्डाणपुलाचे काम जलदगतीने करणेस मोलाचे सहकार्य लाभणार असून,पुलाचे काम पूर्ण झाल्यास पिंपरीगाव, कॅम्प,रहाटणी,पिंपळे सौदागर,काळेवाडी व इतर परिसरातील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
या निवेदनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, या समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्यात येतील, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन संबंधित शासन विभागांसोबत समन्वय साधण्याची तयारी दर्शवली असून निवेदनाच्या मागणीवर लवकरच कार्यवाही होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.